चंद्रपूर- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचार बंदीही आहे. नागरिकांनी घरातच बसावे, काळजी घ्यावी, असे प्रशासन वारंवार आवाहन करत आहे. मात्र, चिमुर तालुक्यातील शंकरपूर आणि कीटाडी सर्कलच्या अंगणवाडी सेवीकांची मासिक सभा बोलावून शासकीय आदेशाला हरताळ फासले आहे.
हेही वाचा- सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात 60 टक्के कपात, शासकीय कर्मचाऱ्यांनाही मार्चमध्ये 50 ते 75 टक्केच वेतन
एकात्मीक बालविकास प्रकल्प कार्यालया अंतर्गत येणाऱ्या शंकरपूर व किटाडी सर्कलचे काम एकाच पर्यवेक्षिकेकडे आहे. नेहमीच्या रुढ नियमाप्रमाणे दर महिन्याला सर्कल प्रमाणे मासिक अहवाल सभा घेण्यात येते. मात्र, कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. तसेच सोशल डिस्टन्स ठेवा असेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे सर्व सभा, बैठका रद्द करण्यात आल्यात. मात्र, या सर्व गोष्टींचा विसर पडलेल्या परिवेक्षिकेने शंकरपूर व किटाळी या दोन्ही सर्कलमधील जवळपास 50 अंगणवाड्यातील सेविकांची मासिक अहवाल सभा शंकरपूर येथील अंगणवडीत बोलावली. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येणारी खबरदारी या सभेत नव्हती. त्यामुळे आता वरिष्ठ अधिकारी या पर्यवेक्षिकेवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.