चंद्रपूर - जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरात काँग्रेस नगरसेवक महेश भर्रे याच्या घरातून तब्बल १०० पेटी दारू जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ब्रम्हपुरी शहरातील पेठ वार्ड परिसरात असलेल्या घरातून रात्री उशिरा हा दारुसाठा जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे मुंबई येथून चंद्रपुरात आलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष भरारी पथकाने ही कारवाई केली. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे हे विधानसभा क्षेत्र आहे.
दारु तस्करीला पोलिसांचा वरदहस्त
चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी असल्याने जिल्ह्यात अवैध दारु तस्करीला ऊत आला आहे. या अवैध व्यवसायात मोठे रॅकेट सक्रिय आहे. या दारुतस्करीला राजकीय आशीर्वाद आणि काही पोलिसांचा वरदहस्त आहे. त्यामुळे दररोज कोट्यवधींची दारू जिल्ह्यात येते. यात सर्वांचा वाटा ठरला आहे. याच आर्शिवादाने संघटित पध्दतीने दारु तस्करी सुरू आहे. अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.
ब्रम्हपुरी नगरपालिकेचा नगरसेवक महेश भर्रे या दारूच्या व्यवसायाची माहिती होती. गेल्या अनेक महिन्यांपासून तो दारु तस्करी करीत होता. पण राजकीय दबावामुळे कारवाई होत नव्हती. उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबईतील विशेष पथकामुळे ही कारवाई शक्य झाली. महेश भर्रे याच्या घरी पथकाने धाड मारली असता त्याच्या घरात दारूच्या शंभर पेट्या आढळून आल्या. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली. भर्रे सोबत आणखी चार जणांवर ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात दारुबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
माझ्यावरील कारवाई राजकीय सुडापोटी
याबाबत महेश भर्रे यांच्याशी संपर्क साधला असता सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले. या घटनेशी माझा काहीही संबध नाही. केवळ राजकीय सुडापोटी कारवाई करण्यात आली. ज्यावेळी ही कारवाई झाली त्यावेळी मी घरीच नव्हतो. ज्या गाडीत ही दारू मिळाली ती गाडी माझी नाही असे ते म्हणाले.
कारवाई भर्रे यांच्या घरातच झाली
मुंबई येथून आलेल्या भरारी पथकाने कारवाई केल्यानंतर याबाबतची तक्रार ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. ही कारवाई भर्रे यांच्या घरातच करण्यात आली. कारवाईची नोटीस देताना भर्रे यांच्या पत्नीला त्यांना फोन करून पोलीस ठाण्यात हजर होण्यासाठी सांगण्यात आले होते. मात्र, ते ठाण्यात हजर झाले नाही. अशी माहिती तपास अधिकारी सुहास झाजुर्णे यांनी दिली.
हेही वाचा- दारूबंदी कायद्याअंतर्गत तिघांना तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
हेही वाचा- मोहोपाड्यात तरुणीवर विनयभंगाचा प्रसंग,आरोपीला अटक