चंद्रपूर - चिमूर तालुक्यातील नेरी येथील लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या चिमुरचे तलाठी बंडू मडावी यांच्या चारचाकीचा रामपूर फाट्याजवळ अपघात झाला. यात त्यांच्या चार वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे गंभीर झाले आहेत. दक्ष बंडू मडावी (वय ४ वर्षे), असे मृत चिमुकल्याचे नाव असून तलाठी बंडू मडावी, पल्लवी तुमराम व जीप चालक किशोर ठाकरे हे तिघे जखमी झाले आहेत.
शुक्रवारी (दि. 19 जून) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तलाठी मडावी हे स्वतःच्या चारचाकीने लग्न समारंभ आटोपून परतत होते. यावेळी ते स्वतः वाहन चालवत होते. रामपूर फाट्याजवळ त्यांची चारचाकी आली असता समोरुन येणाऱ्या मालवाहू जीपशी जोराची टक्कर झाली. यात मुलगा दक्षचा जागीच मृत्यू झाला, तर इतर तिघे जखमी झाले आहेत.
जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून मृत बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पंचनामा करुन पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा - गडचांदूर रुग्णालयात काँग्रेस कार्यकर्त्यांचे अजब फळवाटप, उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांचा पोपट