चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेसने कायमच ओबीसींना डावले आहे. त्यांना आतापर्यंत कोणतीही संधी त्यांनी दिली नाही, असा हल्लाबोल आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते आज चंद्रपुरात बोलत होते. आज त्यांच्याहस्ते ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. डॉ. जीवतोडे यांच्यासाठी भाजप हा सर्वोत्तम पक्ष आहे. आम्ही डॉ. जीवतोडे यांचे भाजपात स्वागत करतो, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हुजुर आते आते बहोत देर कर दी : उपमुख्यमंत्री फडणवीस डॉ. जिवतोडे यांना संबोधून म्हणाले, हुजुर आते आते बहोत देर कर दी. तुमच्यासाठी सर्वात चांगला पक्ष भाजप आहे. सामान्य घरचा चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले. हाच खरा ओबीसींचा सन्मान आहे. प्रधानमंत्री मोदी यांचे अमेरिकेत ज्या पद्धतीने स्वागत झाले, त्यामुळे जगात देशाची मान उंचावली आहे. आज कधी नव्हे, ते देशाच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक ओबीसी मंत्री आहे. भाजपचा डीएनए ओबीसी आहे. भाजपने ओबीसी विद्यार्थिसाठी परदेशी शिक्षणासाठी शिषयवृत्ती दिली. एमपीएससी, यूपीएससी परीक्षा देणाऱ्या ओबीसी विद्यार्थांसाठी अनेक कार्यक्रम सुरू केले असल्याचे ते म्हणाले.
विदर्भात विकासकामे : समृध्दी गडचिरोली, गोंदिया येथे जात आहे. आता चंद्रपूरचा विचार करू असेही फडणवीस म्हणाले. आम्ही गडचिरोलीत पोलाद कारखाना आणला आहे. विदर्भात ४० हजार कोटीची विकास कामे आणली आहेत. हे यापूर्वी कधीही झाले नव्हते. यावेळी डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले, १९६३ मध्ये चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचा रेकॉर्ड तत्कालीन सरकारने जप्त केला. त्यामुळे विदर्भात शैक्षणिक जाळे विणनारे श्रीहरी जिवतोडे गुरुजी समाज कारणातून राजकारणात आले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मी भाजपतून सक्रिय राजकारणात प्रवेश केला. भाजप हा विदर्भ विकासासोबत ओबीसींचा विकास बघतो असे जीवताडे यांनी विचार व्यक्त केले. ओबीसी विकासासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६ शासनपरिपत्रक काढले आहे. मागासवर्गीय आयोगाला संविधनिक दर्जा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. विदर्भाचा विकास विदर्भातील ११ जिल्ह्यातून मुंबईपर्यंत गेला पाहिजे असेही जीवतोडे म्हणाले.
यावेळी मंचावर प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, आमदार संदीप धूर्वे, आमदार परीनय फुके, आमदार संजीव बोदगुलवार, माजी आमदार शोभा फडणवीस, संजय धोटे, सुदर्शन निमकर, माजी आमदार आशीष देशमुख, जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त परिचारिका पुष्पा पोडे यांचा मान्यवरांचे हस्ते गौरव करण्यात आला. पालकमंत्री मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या विकासासाठी निधी खेचून आणला असेही ते म्हणाले. पाहुण्यांचे स्वागत चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने डॉ. अशोक जीवतोडे, श्रीमती प्रतिभा जोवतोडे, अंबर जीवतोडे यांनी केले. संचालन रवींद्र वरारकर यांनी केले.