चंद्रपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. शासन कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न करत आहे. अशात रेड झोन क्षेत्रात तब्बल आठवडाभर वास्तव केलेल्या आरोग्य सेविकेने शेकडो बालकांचे लसीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार कोरपना तालूक्यात समोर आला आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली असून लसीकरण झालेल्या बालकांच्या पालकात भीतीचे वातावरण आहे.
कोरपना तालूक्यातील नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत खिर्डी हे उपकेंद्र आहे. या उप-केंद्रात कार्यरत असलेल्या आरोग्य सेविकेचे मामा यवतमाळ येथे राहत होते. त्याचा मृत्यू झाला तेव्हा त्या आरोग्य सेविकेने रेड झोन क्षेत्र असलेले यवतमाळ गाठले. नाकाबंदी असलेल्या श्रेत्रामध्ये ती आरोग्य सेविका आठवडाभर वास्तवाला होती.
आठवडाभर मुक्काम केल्यानंतर ती तीन दिवसापूर्वी कोरपना तालूक्यातील खिर्डी या गावाला आली. या पार्श्वभूमीवर नारंडाच्या वैद्यकीय अधिकार्यांनी त्या आरोग्य सेविकेला विलगीकरण करणे गरजेचे होते. मात्र तिला विलगीकरण न करता उलट त्या आरोग्य सेविकेचा हातातून धामणगाव आणि नैतामगुडा येथील बालकांचे लसीकरण करण्यात आले. शिवाय खिर्डी गावातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात आली आहे. हे सारे घडल्यानंतर ती गडचांदूरला आली. तेथील वार्ड नं.पाच मध्ये एका घरी भाड्याने राहुन ती खिर्डीला सेवा देत आहे.
ही बाब गडचांदूरकराना माहिती होताच त्यांनी नगरपालिका प्रशासनाला याची माहिती कळवली. त्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी रात्री नऊ वाजताच्या सुमारास त्या आरोग्य सेविकेच्या घरी जाऊन तिची चौकशी केली असता प्रथम तिने असे काही घडलेच नसल्याचे सांगितले. पण काही वेळाने तिने सर्व बाबींची कबुली दिली.
वैद्यकीय अधिकारी डॉ. टेंभे यांच्या सहमतीनेच लसीकरण केल्याचे तिने सांगितले. याबाबत पालिका कर्मचाऱ्यांनी भ्रमणध्वनीवरून डॉ .स्वप्नील टेंभे यांना विचारणा केली असता, आरोग्य कर्मचाऱ्यांना विलगीकरण गरजेचे नसल्याचे टेंभे यांनी सांगितलं. जिल्हाधिकाऱ्यांचा तसा आदेश असल्याचेही टेंभे यांनी सांगितलं. दरम्यान, पालिका कर्मचाऱ्यांनी डॉक्टरला धारेवर धरले. यानंतर डॉक्टराने आरोग्य सेविकेला घरीच विलगीकरण होण्याचा सल्ला दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या 'त्या' आदेशाच्या आधी घडला 'हा' प्रकार
वैद्यकीय अधिकारी टेंभे यांनी जिल्हाधिकारी यांनी काढलेला आदेशानुसार, आरोग्य सेविकेला लसीकरणासाठी पाठविल्याचे सांगत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचा तो आदेश 15 मे ला काढलेला आहे. मात्र आरोग्य सेविकेने त्या पुर्वीच बालकांना लसीकरण केले आहे.
गावकऱ्यांनी त्या आरोग्य सेविकेला गावाबाहेर ठेवलं -
नगरपालिकेचा दबाव वाढल्यानंतर त्या आरोग्य सेविकाला होम क्वारंटाइन करण्यात आले. मात्र दुसऱ्याच दिवशी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला कोरपना तालूक्यातील खिर्डी येथे दैनंदिन आरोग्य सेवा पुरविण्यासाठी पाठविले. मात्र गावकऱ्यांनी तिला गावात प्रवेश करु दिला नाही. ती गावाच्या बाहेर अर्धा तास थांबली अन् गडचांदूरला परत गेली.
हेही वाचा - दुचाकीच्या धडकेत अंगणवाडी सेविकेचा मृत्यू, चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील घटना
हेही वाचा - तहसीलदारांच्या नोटीसने निराधारांची घालमेल वाढली; योजनांचा धनादेश स्वीकारण्यास स्थानिक बँकेचा नकार