चंद्रपूर - पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सारा देश शोकसागरात बुडाला आहे. चंद्रपूर येथे मात्र भाजपची असंवेदनशीलता समोर आली. शहरातील विकासकामांच्या भूमीपूजनाचा सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. ढोलताशांचा गजर, ऑर्केस्ट्रा, एलईडी स्क्रीन, ड्रोन कॅमेऱ्यातुन लाईव्ह चित्रीकरण एवढेच नव्हे तर कार्यकर्ते आणि पाहुण्यांसाठी नॉन व्हेज पार्टीची मेजवानी ठेवण्यात आली होती. या असंवेदनशील प्रकाराबाबत आता सोशल मीडियावरून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
रविवारी १७ फेब्रुवारीला शहरातील विविध विकासकामांचे भूमीपूजन अर्थ, व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. मात्र, प्रभाग ९ मधील नगीनाबाग येथील भूमीपूजनाचा कार्यक्रम सर्वाधिक चर्चेचा ठरला. मनपाच्या स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे याच प्रभागातून निवडून आले. रेव्हन्यू कॉलनी चौकात रात्री ७ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुनगंटीवार यांच्यासह आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर उपस्थित होते. प्रभागातील राहुल पावडे यांच्यासह नगरसेवक सविता कांबळे, वंदना तिखे, बंटी चौधरी कार्यक्रमाचे आयोजक होते.
३ दिवसांपूर्वी देशात मोठा दहशतवादी हल्ला झाला. अशावेळी साध्या पद्धतीने देखील हा कार्यक्रम होऊ शकला असता. मात्र, आचारसंहिता लागण्यापूर्वी आपण सर्व गाजावाजा करून घेण्याचा मानस यामध्ये दिसून आला. पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी मोठ्या बँड पार्टीला पाचारण करण्यात आले. रहदारीच्या रस्त्यावर कार्यक्रमाचा मंच उभारण्यात आला होता. त्यामुळे यावरील वाहतूक दिवसभर बंद होती, कार्यकर्त्यांच्या मनोरंजनासाठी देशभक्तीपर ऑर्केस्ट्रा, लाइव्ह चित्रीकरण करणारे ड्रोन आणि एलईडी स्क्रीन लावण्यात आली. देशावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व देश शोकसागरात बुडाला असताना भाजपने इतका गाजावाजा करून हा कार्यक्रम करणे गरजेचे होते का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. सोशल मीडियावर तर या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
याबाबत भाजपचे आमदार नाना श्यामकुळे आणि मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. ही पार्टी नसून एक कार्यक्रम होता, कार्यक्रमाची सुरुवात शहिदांना श्रद्धांजली देऊन करण्यात आली असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, असे असतानाही इतका दिमाखदार सोहळा करणे गरजेचे होते का? हा प्रश्न अद्याप कायम आहे.