चंद्रपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक जयस्वाल यांना चंद्रपूर पोलिसांनी दारू तस्करी प्रकरणात अटक केली आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास वडगाव येथील जयस्वाल यांच्या घरासमोर ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी कारवाई दरम्यान दीपक जयस्वाल यांच्यासह त्यांच्या वाहनाचा चालक मयुर राजेश लहेरिया व नोकर राजेश चित्तुरवार या दोघांनाही अटक केली आहे.
हेही वाचा... सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दीड लाख रुपयांची बॅग लंपास; घटना सीसीटीव्हीत कैद
नेमके काय घडले ?
नगरसेवक दिपक जयस्वाल यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात दारुसाठा असल्याची माहिती चंद्रपुर उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाला मिळाली. या आधारावर उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लाकडे व विशेष पथकाने घटनास्थळी धाड टाकली. यावेळी जयस्वाल यांच्या घरासमोर त्यांच्या वापराच्या एका घरामध्ये दारुचा साठा करत असताना पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. एकूण 5.50 लाख किंमतीचे मद्य आणि एक चारचाकी गाडी असा एकूण 15 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
हेही वाचा... पुण्यातील २ भामट्यांनी लॉन व्यवसायिक प्राध्यापकाला घातला ९ लाखांचा गंडा
विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा दीपक जयस्वाल यांच्यावर पडोली पोलिस ठाण्यात दारु बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे.