चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात अनेक उद्योग आहे, पण त्यामुळे प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. आता या जिल्ह्याला पर्यावरणपूरक उद्योगांची गरच आहे. ही गरज लक्षात घेता जिल्ह्यात इलेक्ट्रिक ऑटोमोबाइल प्लांट व टेक्स्टाईल पार्क उभारण्यात यावे, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. यासाठी त्यांनी नुकतीच शरद पवार आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सकारात्मक चर्चा झाली असून आवश्यक ती पाऊले उचलण्यात येणार असे आश्वासन देण्यात आले आहे. मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत खासदार धानोरकर यांच्यासह त्यांची पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर आणि विदर्भ एमआयडीसी अध्यक्ष मधुसूदन रुंगठा यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यात रोजगाराची निर्मिती होण्यासाठी उद्योगधंद्यांची नितांत आवश्यकता आहे. आर्थिक सुबत्ता आल्याखेरीज या भागाचा सर्वांगिन विकास होणे कठीण आहे. त्यासाठी खासदार बाळू धानोरकर यांनी याआधी केंद्र व राज्य स्तरावरील मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या मुख्य उपस्थित बैठक पार पडली. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पियुष गोयल व राज्यातील उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे कडे धानोरकर यांनी सातत्याने पत्राचार व बैठक घेऊन प्रयत्न केले. याआधी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्ह्यात टेक्सटाईल पार्क उभारण्याची मागणी लोकसभेत देखील केली होती. बैठकीत शरद पवार यांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना चंद्रपुरात इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल्स प्लांट उभारण्याबाबत आवश्यकतांची तपासणी करण्याची सूचना केली. तसेच जिल्ह्यात उद्योग निर्मितीत राज्य सरकारकडून संपूर्ण सहकार्य करा असे सांगितले. तर टेक्सटाईल पार्क संदर्भातील मागणीबाबत दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांचे समवेत बैठक घेण्याचे ठरले आहे.
चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा क्षेत्र आदिवासी बहुल आहे. या भागात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. त्यासोबतच धान, सोयाबीन, ही पिके प्राधान्याने घेतली जातात. येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देखील टेक्स्टाईल पार्क मुळे सुगीचे दिवस येऊ शकतात. खासदार बाळू धानोरकर यांनी खासदार शरदचंद्र पवार यांच्या मुख्य उपस्थितीत घेतलेल्या बैठकीमुळे जिल्ह्यात नवे उद्योग निर्माण होण्याच्या हालचालींना गती मिळाली आहे.