चिमूर - विधानसभेसाठी भाजपचे उमेदवार किर्तीकुमार भांगडिया यांनी त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात सामान्य जनता व शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारचे कामे केली नाहीत. त्यामुळे चिमूर विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेने काँग्रेसचे उमेदवार डॉ . सतिश वारजुरकर यांना पाठिंबा दिला असून काँग्रेसच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे यांनी दिली.
चिमूर विधानसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका विषद करण्यासाठी उपजिल्हा प्रमुख आणि विधानसभा अध्यक्ष प्रशांत कोल्हे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली. 'चिमूर विधानसभा निवडणुकीसाठी मनसेचा कोणताही उमेदवार नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची निवडणूकीमधील भूमिका ठरविण्यासाठी रामदेगी या तीर्थस्थळी मनसैनिक आणि हितचिंतकाची २ आक्टोबरला संवाद सभा घेण्यात आली. या संवाद सभेत विद्यमान आमदार किर्तीकुमार भांगडीयाच्या भूमिकेविषयी चर्चा करण्यात आली. त्यात सर्वांचे एक मत झाले की आमदारांनी सर्व सामान्य जनता तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे व त्यांची समस्या सोडविण्यासाठी कोणतेही काम केलेले नाही,' असे कोल्हे म्हणाले.
'वहान ग्रामस्थांनी अवैध दारू विक्री विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. मात्र, आमदार भांगडियांनी याविषयी कोणतीही सकारात्मक भूमिका घेतली नाही. यामुळे प्रशांत कोल्हे यांना ५६ दिवसांची हद्दपारीची शिक्षा भोगावी लागली. त्यामुळे आता आमदार भांगडिया यांना पाच वर्ष आमदारकीपासून हद्दपार करण्याचा रामदेगी येथे सर्वानुमते निर्णय घेण्यात आला,' असे कोल्हे म्हणाले. यासाठी काँग्रेस उमेदवार डॉ. सतीश वारजूरकर यांचा प्रचार तन मन धनाने करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे चंद्रपूर उपजिल्हाप्रमुख आणि चिमूर विधानसभा अध्यक्ष प्रशांत कोल्हे यांनी सांगितले. तालुका उपाध्यक्ष बाबाराव पाटील, शुभम बारसागडे, चिमूर शहर अध्यक्ष नितीन लोणारे, विभाग प्रमुख मंगेश ठोंबरे तथा अभिषेक कारेकार उपस्थित होते .