चंद्रपूर - चिमूर विधानसभा मतदारसंघाचा यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी कुठलाही ठोस विकास केला नाही. मी आमदार झाल्यापासून रोजगार, आरोग्य, आणि मूलभूत सोयीसुविधांसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. मागील साठ वर्षांत जे झाले नाही ते मागील साठ महिन्यांत काम करण्याचा प्रयत्न केला, अशी प्रतिक्रिया चिमूर मतदारसंघाचे आमदार आणि भाजपचे उमेदवार बंटी भांगडीया यांनी दिली.
आमदार बंटी भांगडिया यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्यांवर भाष्य केले. 2014 च्या निवडणुकीत जनतेने आपल्याला भरघोस मतांनी निवडून दिले. यावेळेसही जनता आपल्यालाच जिंकून देणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपमध्ये असलेले धनराज मुंगळे यांनी बंडखोरी केली. ते अपक्ष लढत आहेत. मात्र, याचा कुठलाही परिणाम मतदानावर होणार नाही. भाजपचा कार्यकर्ता कधीही बंडखोरीला थारा देत नाही, असेही त्यांनी म्हटले. पुन्हा निवडणूक आल्यास आपण रोजगार निर्मितीसाठी ठोस प्रयत्न करणार आहे. मोठा प्रकल्प या क्षेत्रात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असेही भांगडीया यांनी सांगितले.