चंद्रपूर - दहा बाय तेराच्या अडगळीच्या खोलीतील तिचे जग. आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्याच खोलीत संसार आणि व्यवसाय चालविण्यासाठीची तारेवरची कसरत. मात्र, दृढ इच्छाशक्ती आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असली की संकटं आणि आव्हानांचे आभाळ देखील ठेंगणे होत जाते. बांबूवर क्यूआर कोड (Bambu QR Code) विकसित करणारी एकमेव भारतीय महिला मीनाक्षी वाळके (Minakshi Walke) यांच्या या असामान्य प्रवासाच्या यशाचे हे आत्तापर्यंतचे टोक जरी असले, तरी त्यांची ओळख केवळ इथवर सिमीत नाही. त्यांनी बांबूपासून तयार केलेल्या हस्तकलेची ख्याती आता सातासमुद्रापार गेली आहे. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना यासाठी सन्मानित करण्यात आले आहे. राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मीनाक्षी यांच्याकडून तयार केलेल्या विषेश राख्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पाठवल्या. देशाचे पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Jawdekar) यांनी मीनाक्षी यांना पुरस्कृत केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) हे नुकतेच चंद्रपुरच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते मीनाक्षी वाळके यांना सन्मानित करण्यात आले. मात्र, इथवरचा त्यांचा हा प्रवास सोप्पा नव्हता.
- दुःखातून मिळाली प्रेरणा -
26 मे 2014 ला मीनाक्षी यांचा विवाह मुकेश वाळके यांच्याशी झाला. बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या मीनाक्षीला प्लायवूड किंवा इतर वस्तूंपासून काही कलाकुसरी करण्याची आवड होती. मात्र, 2018 ला एक मोठी घटना घडली. ज्यामुळे त्या हादरून गेल्या. 8 महिन्यांची बाळंतीण असताना त्यांचे बाळ मृत प्रसूत झाले. त्यामुळे त्या नैराश्याच्या गर्तेत गेल्या. त्यातून सावरण्यासाठी पती मुकेश वाळके आणि जवळच्या लोकांनी बळ दिले. घरी राहून त्याच मनस्थितीत राहण्यापेक्षा बांबू प्रशिक्षण केंद्रात हस्तकलेचे प्रशिक्षण घेण्याचा सल्ला त्यांना दिला. 70 दिवसांच्या प्रशिक्षणात त्यांनी बांबूपासून कुठल्या कुठल्या गोष्टी करता येतात त्याचे धडे घेतले. हे केल्याने त्यांचं दुःख विसरायला मदत झाली.
- नागपुरातील प्रदर्शनीतून मिळाली प्रेरणा -
नागपुरात एका प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मीनाक्षी यांनी बांबु प्रशिक्षण केंद्रातून काही वस्तू खरेदी केल्या होत्या. यावस्तुंना येथे येणाऱ्या लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. बांबूपासून तयार केलेल्या वस्तू लोक आवर्जून बघतात, खरेदी करतात, हे त्यांच्या लक्षात आले. मग याच आणि यापेक्षा वेगळ्या वस्तू आपणही तयार करू शकतो. हे त्यांना समजलं आणि दृष्टीने त्यांनी आपल्या घरीच काम करायला सुरूवात केली. शेतकऱ्यांकडून ओला, वाळला बांबू खरेदी करायचा आणि त्यापासून राख्या, कुंकुवाचे करंडे, प्रकाशदिवे, बास्केट तयार करायला सुरुवात केली.
- सोशल मीडियाचा उपयोग -
मीनाक्षी यांनी अभिसार इनोव्हेटीव्ह नावाचे फेसबूक पेज तयार केले. यात ज्यांना या कलेची जाण आहे. अशा देशभरातील अनेक व्यक्तींना जोडण्यात आले. त्यावर बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंचे फोटो टाकायला सुरुवात केली. लोकांना या वस्तू आवडायला लागल्या. ते यावर खरेदीसाठी मागणी करू लागले. विशेषतः राख्या खरेदीसाठी अनेक ऑर्डर मिळू लागल्या. मीनाक्षी यांच्या मेहनतीचे चीज होऊ लागले.
- दिल्लीतील कार्यक्रम ठरला मैलाचा दगड -
सोशल मीडियाच्या प्रसारावरून वीरेंद्र रावत यांचा संपर्क आला. दिल्ली येथे 2019 मध्ये 'मिस क्लायमेट' नावाची सौंदर्य स्पर्धा घेण्यात येणार होती. पर्यावरणपूरक अशी ही थीम असल्याने रावत यांनी विजेत्यांना देण्यात येणारा क्राऊन बांबूपासून तयार करता येईल काय, अशी विचारणा मीनाक्षी यांना केली. यापूर्वी असे काहीच केले नव्हते. मात्र, त्यांनी याला एक आव्हान म्हणून घेत तयार करण्यास होकार दिला. त्यांनी दोनचार प्रकारचे क्राऊन तयार केले त्यातील एकाचे डिझाईन रावत यांना आवडले आणि त्यांनी यावर शिक्कामोर्तब केला. मात्र, अवघ्या सात दिवसांत 16 क्राऊन तयार करण्याचे आव्हान होते. मात्र, अविरत मेहनत करून हे लक्ष्य मीनाक्षी यांनी सध्या केले. मीनाक्षी यांच्या हस्तकलेने प्रभावित होऊन त्यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले आणि त्यांना सन्मानित देखील करण्यात आले. हा अनुभव मुठभर मांस वाढविणारा होता, असे मीनाक्षी वाळके सांगतात.
- विदेशातून मागणीला सुरुवात -
सोशल मीडियाला देशाचे काहीही बंधन नाही. मीनाक्षी यांचे काम अनेक देशातील अनिवासी भारतीयांपर्यंत पोचले. स्वीडनवरून त्यांना 80 कीचैन तयार करण्याची ओर्डर मिळाली. लंडनमध्ये 'ग्लोबल बाप्पा' नावाचे स्टोअर मीनाक्षी खोडके चालवतात. त्यांनी बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या 100 राख्यांची ऑर्डर दिली. रक्षाबंधनाच्या दरम्यान राख्या हातोहात विकल्या गेल्या. त्यानंतर पुन्हा 600 राख्या मागविण्यात आल्या, त्याही हातोहात खपल्या. मग आणखी 600 राख्यांची ऑर्डर देण्यात आली. अशापध्दतीने तब्बल 1300 राख्या एकाचवेळी विकल्या गेल्या. या राख्या संपूर्ण युरोपमध्ये अनेक देशांत गेल्या. मुंबई येथील श्रीलता मेनन नावाच्या महिला तर मीनाक्षी यांच्या कलेच्या चाहत्या आहेत. रक्षाबंधनाच्या वेळी दरवर्षी किमान चार ते पाच हजार राख्या त्या मागवून घेतात. आता मीनाक्षी यांची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचली आहे. अनेक प्रसारमाध्यमांनी त्यांच्या कलेची दखल घेतली आहे. ज्यामुळे त्यांची ख्याती जगभरात पोचण्यास मदत मिळाली आहे.
- पतीची भक्कम साथ -
मीनाक्षी यांच्या या यशामागे त्यांचे पती मुकेश वाळके यांची भक्कम साथ लाभली आहे. त्यांच्या सहकार्याविना हे शक्य नसल्याचे मीनाक्षी सांगतात. मुकेश वाळके हे प्रसारमाध्यम क्षेत्रात काम करतात. घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असतानाही त्यांनी आपल्या पत्नीचे काम कधीच थांबू दिले नाही. एक पती म्हणून जेजे सहकार्य करता येईल, अशा प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांनी केली. कुठला ऑर्डर कसा पोचवायचा याची सगळी कामे त्यांनी केली, करत आहेत. नवनव्या आयडिया आणि सल्ले ते मीनाक्षी यांना देतात. मार्गदर्शन करतात त्यामुळे हा संघर्षमय प्रवास करताना मीनाक्षी यांनी कधीही आत्मविश्वास गमावला नाही.
- बांबूपासून क्यूआर कोड निर्मितीची गोष्ट -
शहरातील समर्थ बुक डेपोचे मालक निखिल तांबेकर हे मुकेश वाळके यांचे मित्र तसेच चोखंदळ ग्राहक. कुठली वस्तू कशी बनली त्यात आणखी काय करता येऊ शकते, यावर नेहमीच ते मोकळेपणाने व्यक्त होत असतात. एकेदिवशी मुकेश बांबूच्या वस्तू घेऊन बुकडेपोत गेले असता त्यांनी सहजच सध्या चलनात असलेल्या प्लास्टिकच्या क्यूआर कोडच्या पाटीकडे बोट दाखवून म्हटले की यात काही बांबूचा प्रयोग होऊ शकेल का बघा. ही गोष्ट मुकेश यांनी मिनाक्षीला सांगितली. त्यांच्या मनात विचार आला की बांबूच्या पाटीवर जर प्लास्टिकच्या थर लावलेला क्यूआर कोड लावला, तर हे शक्य आहे. मात्र त्याला खऱ्या अर्थानं बांबूचा क्यूआर कोड म्हणता येणार नाही. अनेक दिवस विचार आणि प्रयोग सुरू होता. मात्र, त्यात यश मिळाले नाही. बांबूच्या वस्तूवर एखाद्याचे नाव कोरायचे असेल तर लेजर टेक्नॉलॉजीचा उपयोग होतो, मग तसाच प्रयोग बांबूच्या पाटीवर त्यांनी प्रयोग करून बघितला. त्यांनी मोबाईल स्कॅन केला आणि आश्चर्य म्हणजे एका क्षणात तो स्कॅन झाला. अशा पद्धतीने बांबूच्या पाटीवर क्यूआर कोड साकारण्याचा देशातील पहिला प्रयोग यशस्वी झाला. आता या क्यूआर कोडची मोठी मागणी मीनाक्षी यांच्याकडे येत आहे.
- 'बस इतनासा ख्वाब है' -
आतापर्यंत मीनाक्षी हे सर्व काम हातानेच करीत होते. मात्र, कामाचा व्याप वाढला असताना त्यांना मशीनची गरज भासू लागली आहे. अशा मशीन घेतल्या तर काम लवकर होईल, त्याची किंमत मर्यादित ठेवता येईल. सध्या मीनाक्षी यांच्या कामामुळे अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. मात्र, जागा नसल्याने हे काम त्या घरीच करतात. दिवाळी आणि रक्षाबंधन हे महत्त्वाचे सिजन आहेत. त्यावेळी महिला सहज मिळतात. मात्र, इतर वेळी त्या उपलब्ध होत नाहीत. भविष्यात एक वर्कशॉप टाकायचे आणि त्या माध्यमातून मोठ्या संख्येने स्थानिकांना रोजगार द्यायचा. बाराही महिने काम सुरू ठेवायचे, असे स्वप्न वाळके दाम्पत्याचे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे ऑर्डर पोचविण्यासाठी मोठी अडचण होते. अशावेळी इम्पोर्ट-एक्स्पोर्टचे लायसन्स काढून ही बाब सुकर करायची, असे स्वप्न वाळके दाम्पत्याने बाळगले आहे. आर्थिक स्थिती कठीण आहे. मात्र, तरीही त्यांनी आज यशस्वी लोकांच्या यादीत आपले मानाचे स्थान कमावले आहे. त्यामुळे भविष्यात आपले स्वप्न पूर्ण होईपर्यंत हे दाम्पत्य स्वस्थ बसणार नाही.
हेही वाचा - Mumbai Mayor Death Threats : मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी