चंद्रपूर - देशभरात जनावरांची मोजणी होते. मात्र मागील ९० वर्षात ओबीसींची जनगणना झाली नाही. त्यामुळे सन २०२१ च्या जनगणेत ओबीसींचा कॉलम हवा. अन्यथा जनगणनेत सहभागी होणार नाही, असा इशारा हजारो संख्येत एकत्र आलेल्या ओबीसींनी दिला.
ओबीसी जनगणना समन्वय समितीच्या वतीने आज चंद्रपुरात ओबीसींचा विशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्याभरातून हजारोंच्या संख्येत ओबीसी प्रवर्गातील पुरूष, महिला आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. या मोर्चात ओबीसी प्रवर्गातील सर्वच जाती समूहांचा समावेश होता. संविधान दिनी आयोजित या मोर्चाचा प्रारंभ दीक्षाभूमी येथून झाला. शहरातील मुख्य मार्गावरून गेलेल्या मोर्चाचा समारोप चांदा क्लब मैदानावर झाला.
कोविडच्या पार्श्वभूमीवर हजारोंच्या संख्येने जमाव -
ओबीसींची जात निहाय जनगणना झालीच पाहिजे, अशा घोषणांनी शहर दणाणून गेले. कोविडची पाश्र्वभूमी असतानाही मोठ्या संख्येत लोक एकत्रित आले. सर्वच राजकीय पक्षांचे नेते या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाचा समारोप चांदा क्लब मैदानासमोर झाला. या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वच पक्षांचे राजकीय नेते मोर्चात सहभागी झाले होते. मात्र ते सामान्य ओबीसी कार्यकर्ता म्हणून मोर्चाला हजर होते. विशेष म्हणजे बहुजन कल्याण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे आणि आमदार किशोर जोरगेवार, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या ताई गुरनुले व्यासपीठाच्या खाली मोर्चेकऱ्यांमध्ये बसले होते. त्यांना जनगणना समन्वय समितीच्यावतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
..म्हणून ओबीसींमध्ये असंतोषाची ढिणगी -
यावेळी ओबीसी जनगणना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. या समितीचे संयोजक बळीराज धोटे यांनी समारोपी भाषण केले. आजवरच्या राजकर्त्यांनी ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविले नाहीत. म्हणून ओबीसींमध्ये असंतोषाची ढिगणी पडली आहे. जो समाज रडतो. त्याचे अश्रू राज्यकर्ते पुसतात. त्यामुळे ओबीसींनी आता रडले आणि लढले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. २०२१ च्या जातनिहाय जनगणेत ओबीसींची मोजणी झाली नाही तर जनगणनेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मोर्चेकऱ्यांनी जाहीर केला.
जनावरांची नोंद आहे, मात्र ओबीसींची नाही -
ओबीसी समन्वय समितीचे समन्वयक डॉ. राकेश गावतुरे म्हणाले, या देशात जनावरांची संख्या दफ्तरी आहे. नदी-नाल्यांची संख्या माहिती आहे, मात्र ओबीसींची लोकसंख्या माहिती नाही. ही शोकांतिका आहे. या वर्गाची सामाजिक-आर्थिक स्थिती मग देशाला कशी कळणार, त्यांच्या उत्थानाचे काय होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान मोर्चकऱ्यांसाठी विविध सामाजिक संघटनांनी शहरात मदतीचा हात दिला. यंग चांदा बिग्रेड, ओबीसी मुस्लिम संघटनांनी पाणी वाटप केले. मोर्चासाठी जवळपास एक हजाराहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त होता. कोविडच्या पाश्र्वभूमीवर प्रत्येक मोर्चेकऱ्याला सॅनिटायझर देण्यात आले. मोर्चा शांततेत पार पडला. पहिल्यांदा ओबीसी समाजातील विविध संघटना एकत्र येवून रस्त्यावर उतरल्याचे बघायला मिळाले.