चंद्रपूर Mahaparinirvana Din : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांना नागपुरात बौद्ध धर्माची दीक्षा देऊन चंद्रपूर गाठलं होतं. 16 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी आपल्या अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. यानंतर 17 ऑक्टोबर रोजी ते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या निवासस्थानी भेट देण्यासाठी आले होते. त्यावेळी बाबासाहेबांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. बाबासाहेबांना पाहण्यासाठी अनुयायी घराच्या छतावर देखील चढले होते, अशी आठवण सुधा खोब्रागडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितली.
पाया पडण्यास नकार : सुधा खोबरगडे या त्यावेळी 19 वर्षांच्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाहिल्यानंतर मी त्यांचं दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाबासाहेबांनी सुधा खोब्रागडेंना नकार दिला. बाबासाहेब कधीही आपल्या अनुयायांना त्यांच्या पाया पडू देत नव्हते. त्यांना दैवतीकरण मान्य नव्हतं. अस्पृश्य समाजाच्या पिढ्या मानसिक गुलामगिरीत उद्ध्वस्त झाल्या होत्या. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी आपण त्यांचं प्रबोधन करत आहोत. त्यामुळं आता या समाजानं पुन्हा मानसिक गुलामगिरीत पडू नये, असं बाबासाहेबांना काय वाटायचं. म्हणूनच त्यांनी कधीच त्यांच्या अनुयायाना त्यांचं दर्शन घेऊ दिलं नाही, असं सुधा खोब्रागडे यांनी सांगितलं.
नागपूर ते चंद्रपूर प्रवास : 16 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेब नागपूरच्या शाम हॉटेलमधून सकाळी पाच वाजता चंद्रपूरसाठी निघाले. त्यांच्या सोबत माईसाहेब, त्यांचे भाऊ कबीर, सेवक नानकचंद रत्तू होते. बाबासाहेबांनी खासगी गाडीनं उमरेड, भिवापूर, नागभीड, मूल, चंद्रपूर असा प्रवास केला. रस्ता कच्चा तसंच खडतर असल्यानं बाबाहेबांना खूप मोठा त्रास सहन करावा लागला, अशी आठवण खोब्रागडे यांनी सांगितली.
बाबासाहेबांनी खाल्ली चटणी भाकरी : बाबासाहेबांचं मूल गावात स्वागत करण्यासाठी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे वडील देवाजी भिवाजी खोब्रागडेंसह जनार्दन संत गुरुजी अगोदरच तिथं पोहोचले होते. बाबासाहेबांची राहण्याची व्यवस्था शासकीय विश्रामगृहात करण्यात आली होती. प्रवासानंतर बाबासाहेब फार थकले होते. शिवाय त्यांनी जेवण केलं नव्हतं. त्यामुळं बाबासाहेबांनी जेवणासाठी चटणी-भाकरीची मागणी केली. तेव्हा जवळच असणाऱ्या पिसाबाई गोवर्धन यांच्या घरून बाबासाहेबांना त्वरित चटणी भाकर आणून देण्यात आली, असं खोब्रागडे यांनी सांगितलंय.
पांढरे कापड मिळेना : दीक्षा घेण्यासाठी लाखो अनुयायी बाबासाहेबांची आतुरतेनं वाट पाहात होते. आंध्र प्रदेशातील अनुयायी, यवतमाळ, वणी, वर्धा, आदिलाबाद जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने बाबासाहेबांचे उपासक यावेळी जमले होते. बाबासाहेबांनी धम्मदीक्षा देताना सर्वांना पांढरे वस्त्र परिधान करण्याची विनंती केली होती. मात्र त्यावेळी पांढरे कपडे बाजारात उपलब्ध नव्हते. ज्यांना घेता आले, त्यांनी ते घेतले. ज्यांना ते घेता आले नाहीत, त्यांनी मिळेल ते कपडे घालून दीक्षा घेतली.
बाबासाहेबांनी दिली धम्मदीक्षा : बाबासाहेबांचं सर्किट हाऊसमध्ये आगमन होताच त्यांना समता सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात आली. थोडा वेळ आराम केल्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांनी दीक्षाभूमीकडं प्रस्थान केलं. त्यांचे सेवक नानकचंद रत्तू यांच्या मदतीनं बाबासाहेब व्यासपीठावर आले. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषानं सारा परिसर दुमदुमत होता. त्यांनी सर्वांना हात जोडण्यास सांगितलं. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना धम्मदीक्षा दिली. नंतर बाबासाहेबांनी सांगितलेल्या २२ प्रतिज्ञा वाचण्यात आल्या. यानंतर बाबासाहेब खुर्चीवर बसले. त्यांना विश्रांतीची गरज होती, अशा आठवणी सुधा खोब्रागडे यांनी आज सांगितल्या.
हेही वाचा -
- 'या' वास्तूत भजी, सोडा आणि जमायची गप्पांची मैफल, वाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची साहित्यिक आठवण
- बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिलच्या स्मारकाबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
- महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर लोटला जनसागर; राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांकडून बाबासाहेबांना अभिवादन