चंद्रपूर - देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांना अळ्यायुक्त नाश्ता दिला जात आहे. हा प्रकार जिल्हा परिषदेद्वारे आयोजित विज्ञान परिषदेतील असुन मागील दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या नाश्त्यात अळ्या आढळत आहेत. विद्यार्थ्यांबाबत जिल्हा परिषद प्रशासन कीती गंभीर आहे, याचीच प्रचिती या प्रकारातून येत आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने शहरातील ज्युबिली हायस्कूल येथे जिल्हास्तरीय विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील अनेक शाळेचे विद्यार्थी सामील झाले आहेत. या विद्यार्थ्यांना नाश्ता तसेच भोजनाची व्यवस्था करून देण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची आहे. याचे कंत्राट चिमूर येथिल सुधाकर तराडे यांना देण्यात आले आहे. दररोज तीनशे ते साडेतीनशे लोकांसाठी नाश्ता आणि भोजन बनविले जाते. मात्र, याच्या दर्जाकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात येत आहे. अन्य सोयीसुविधा पुरविण्याकडेही सपशेल दुर्लक्ष करण्यात येत आहे. मागील दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांना जो नाश्ता दिला जात आहे, त्यात अळ्या निघत आहे. सिंदेवाही तालुक्यातील देवयानी शाळेतील एका मुलाच्या नाश्त्यात आज पुन्हा अळी आढळून आली आहे. या संबंधात शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असा प्रकार घडला असल्याला दुजोरा दिला. मात्र, या नंतर त्वरित अळी आढळलेला उपमा परत घेण्यात आला आणि या जागी विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी पोहे तयार करून देण्यात आले, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. कंत्राटदार सुधाकर तराडे यांनी यापूर्वी आपण उत्कृष्टच जेवण आणि नाश्ता तयार करीत होतो. अळ्या कशा निघाल्या हे अजून कळले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. एकंदरीत या गंभीर प्रकाराकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले आहे.