चंद्रपूर - रेल्वेच्या धडकेत चंद्रपूर-मूल मार्गावर एका बिबट्याचा मृत्यू झाला. रेल्वे प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाने पुन्हा एकदा बिबट्याचा नाहक जीव गेल्याचे समोर येत आहे. जंगलातील मार्गावरून जाताना रेल्वेची गती कमी असावी, असे निर्देश वनविभागाने रेल्वे विभागाला दिले होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. नियम पायदळी तुडवल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.
हेही वाचा - भाविकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला, दोन महिला ताब्यात
चंद्रपूर-मूल हा रेल्वे मार्ग लोहारा या घनदाट जंगलातून जातो. येथे जंगली जनावरे मोठ्या संख्येने आहेत. ज्यामध्ये वाघ, बिबट्या, अस्वल आदी प्राण्यांचा समावेश आहे. त्यामुळे या मार्गावरून जाताना रेल्वेची गती कमी असावी, असे निर्देश वनविभागाने रेल्वे विभागाला दिले होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मागच्या वर्षी या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे एक वाघीण आणि तीन बछड्यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. याबाबत सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या घटनेनंतर देखील रेल्वे प्रशासनाने दखल घेतली नाही. सोमवारी सकाळी रेल्वेच्या धडकेत पुन्हा एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. बल्लारपूर-गोंदिया पॅसेंजर गाडीने मूलजवळ बिबट्याला धडक दिली. बिबट्याचे वय अंदाजे दोन ते तीन वर्ष असल्याचे सांगण्यात येते. रेल्वे प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही घटना घडली असल्याची प्रतिक्रिया वन्यजीवप्रेमी व्यक्त करीत आहेत.
हेही वाचा - धुळे जिल्हा परिषदेतील लाचखोर कर्मचारी अटकेत