चंद्रपूर - रस्ता ओलांडताना मादा बिबट्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना काल (दि. 3 नोव्हेंबर) मध्यरात्री नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील येनसा या गावाजवळ घडली आहे. वनविभागाने या बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेत त्याच्या रीतसर विल्हेवाट लावण्यात आली.
वरोरा शहराला लागून असलेल्या आनंदवन परिसराला लागून झुडूपी जंगल आहे. या परिसरात मादा बिबट्याचे वास्तव्य होते. या बिबट्याला दोन पिलेही होती. मागील चार महिन्यांपासून त्यांचे दर्शन होत होते. काल (दि. 3 नोव्हें.) मध्यरात्री ही मादा बिबट्या येणसा या गावाजवळ नागपूर-चंद्रपूर महामार्ग ओलांडत असताना एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की बिबट्याच्या तोंडाचा चेंदामेंदा झाला. हा बिबट बराच वेळ रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यानुसार वनविभागाच्या पथकाने बिबट्याच्या मृतदेहाचा पंचनामा करत त्याची चंद्रपूरला रवानगी करण्यात आली.
यानंतर औपचारिक सोपस्कार पार पाडत मृतदेहाची रीतसर विल्हेवाट लावली. मादा बिबट्याचा मृत्यू झाल्याने आता त्या पिलाचे काय होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. भविष्यात आशा दुर्घटना रोखण्यासाठी प्रशासन आणि वनविभागाने यावर तोडगा काढणे आवश्यक आहे.
हेही वाचा - मराठा समाजाचा ओबीसीत समावेश नको; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन