चंद्रपूर - भद्रावती तालुक्यातील सावरी येथील शाळेच्या स्वच्छता गृहात बिबट्या घुसला होता. या बिबट्याला अनेक तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
सावरी गावात जिल्हा परिषदेची चौथ्या वर्गापर्यंतची शाळा आहे. या शाळेला लागूनच जंगल परिसर आहे. विशेष म्हणजे शाळेच्या मागे कोणतीही भिंत नाही. आज सकाळी शाळेत 14 मुले होती, तर आवारात अंगणवाडीतील 10 मुले होती. त्यावेळी एका मुलाला स्वच्छता गृहात बिबट्या असल्याचे दिसले.
यावेळी अंगणवाडी सेविका गीता चौधरी यांनी प्रसंगावधान दाखवत स्वच्छतागृहाची बाहेरून कडी लावली. त्यानंतर याबाबतची माहिती स्थानिक प्रशासन आणि वनविभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून बिबट्याला जेरबंद केले.