चंद्रपूर - अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर-नागपूर महामार्गावर घडली. काल रात्री साडे आठ वाजता ही घटना घडल्याचा अंदाज आहे. या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा - कामगारांची पिळवणूक करणाऱ्या कंपनीविरूद्ध प्रहार संघटना आक्रमक, मेडिकल कॉलेजमध्ये आंदोलन
चंद्रपूर - नागपूर महामार्गावर जंगली प्राण्यांचा मृत्यू अनेकदा होत असतो, त्यामुळे वन्यजिवांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा एक चिंतेचा विषय आहे. वाहनांच्या अपघातात आजवर अनेक वन्यजिवांचा मृत्यू झाला आहे. काल एक बिबट्याला यामुळे जीव गमवावा लागला.
नागपूर महामार्गावरील वरोरा - भद्रावती दरम्यान टाकळी गावाजवळ पाच बिबट आढळून आल्याची माहिती आहे. काहींनी या बिबट्यांना जवळून पाहिले. महामार्गाच्या आसपास हे बिबटे भटकंती करत होते. काल रात्री साडे आठच्या सुमारास यातील एक बिबट रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात वाहनाने या बिबट्याला जोरदार धडक दिली. यात या बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अज्ञात वाहन घटनास्थळावरून पसार झाले. उरलेले चार बिबट इतरत्र पळून गेल्याचे काही प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.
मृत्यू झालेला बिबट रस्त्यावर पडून असल्याचे काही प्रवाशांना आढळून आल्याने काहींनी भद्रावती वनपरिक्षेत्राधिकारी शेंडे यांना माहिती दिली. वनविभागाच्या चमुने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी बिबट्याच्या मृतदेहाला भद्रावती येथे नेण्यात आले. वारंवार होत असणाऱ्या अशा घटनांमुळे वन्यजिवांचे जीव वाचविण्यासाठी काही ठोस उपाय करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
हेही वाचा - चंद्रपूर : आंबोली ग्राम पंचायतीचा 'एक दिवसाचा सरपंच' उपक्रम.. दर महिन्याला होणार सरपंचाची निवड