चंद्रपूर Higher Education : आत्मविश्वास, जिद्द, चिकाटीनं आकाशालाही गवासणी घालता येते. असाच आदर्श बल्लारपूरातील जय चौधरी या युवकानं निर्माण केला आहे. जय चौधरी या युवकाची उच्च शिक्षणासाठी स्कॉटलंडमधील एडिनबर्ग विद्यापीठात निवड झाली आहे. घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल असताना देखील त्यानं विदेशात शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.
स्कॉटलंडमधील एडिनबर्ग विद्यापीठात निवड : जय चौधरीचे वडील ट्रक ड्रायव्हर तर, त्याची आई मोलमजुरी करून कुटुंबाचा उदर्निवाह करतात. त्यामुळं जयचं शिक्षण देखील मराठी माध्यमाच्या शाळेतूनच झालं. मात्र, जय भारत चौधरी (वय 24) प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उच्च शिक्षणासाठी परदेशात जात आहे. जगातील एक सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या स्कॉटलंडमधील एडिनबर्ग विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी त्याची निवड झाली आहे. यासाठी त्याला राजर्षी शाहू महाराज परदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती मिळाली असून, या अभ्यासक्रमाचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र शासन करणार आहे.
घरची बिकट परिस्थिती : जय चौधरीचा जन्म हा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत झाला. बल्लारपूर येथील बुद्धनगर या दलित वस्तीत गजबजलेल्या ठिकाणी त्याचं घर. वडील ट्रक चालवतात तर, आई मोलमजुरी करते. त्यांच्या घरात फारसं कोणी शिक्षित नाही. जयनं बल्लारपूर येथील सर्वोदय विद्यालयात पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलंय.
आईवडिलांच्या संघर्षातून पेटली ठिणगी : जयला शिक्षणाची आवड होती. तो एक कुशाग्र बुद्धीचा विद्यार्थी आहे हे घरच्यांना देखील लक्षात आलं. त्यामुळं त्याला उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं म्हणून आईवडिलांनी त्याला हैदराबाद येथे बारावीसाठी पाठवलं. मात्र एवढ्या मोठ्या शहरात शिक्षण घेणं काही छोटी बाब नव्हती. आईवडीलांनी हार मानली नाही. त्यासाठी पालकांनी दिवसासह रात्रपाळीत सुद्धा काम केलं. आपल्या शिक्षणासाठी आपले पालक परिश्रमाची पराकाष्ठा करत असल्याचं जयनं जवळून बघितलं. त्यामुळं त्यानं संकल्प करुन उच्च शिक्षण घेण्याचा ध्यास घेतला.
बुद्धविहार बनले ज्ञानमंदिर : बारावीनंतर आपल्याच जिल्ह्यात त्यानं पुढचं शिक्षण घेतलं. त्यानं चंद्रपुरातील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात कम्प्युटर सायन्स या विषयात पदवी मिळवली. मात्र, आपल्या समाजासाठी काही करण्याची तळमळ जयला स्वस्थ बसू देत नव्हती. तो जिथे राहतो त्या बुद्धनगर भागात बहुतेक नागरिक मोलमजुरी करणारे आहेत. त्यामुळं त्यांच्या मुलांना शिकवण्याची काही सोय नव्हती. हीच समस्या लक्षात घेऊन जयनं या मुलांसाठी मोफत शिकवणी वर्ग सुरू करण्याचा विचार केला. ही संकल्पना त्यानं आपल्या समविचारी मित्रांना सांगितली, त्यांनीही यासाठी लगेच होकार दिला. मात्र शिकवण्यासाठी जागाच उपलब्ध नव्हती. त्यानंतर त्यांनी बुद्धविहारात कमिटीची परवानगी घेऊन ज्ञानदानाचं काम सुरू केलं. यासाठी शिकवणी वर्गाचं नाव देखील पंचशील अकादमी ठेवण्यात आलं. मुलांना मोफत शिकवणी मिळत असल्यानं पालक देखील आपल्या मुलांना विहारात पाठवू लागले. या माध्यमातून जयसह त्याच्या मित्रांनी तब्बल 250 मुलांना शिकवणी दिली. यातून त्यांच्यात शिक्षणाविषयी गोडी निर्माण झाली.
बाबासाहेबांची भाषणं वाचून व्यक्तिमत्वात क्रांती : जयला लहानपणापासून वाचनाची गोडी होती. लहानपणापासून मिळेल ते पुस्तक तो वाचून काढत होता. त्यामुळं त्याला सामाजिक स्थितीची जाणीव होती. घरी बाबासाहेबांची काही पुस्तके होती. ती वाचल्यानं जयमध्ये उत्सुकता तयार झाली. मराठी शाळेत शिक्षण झाल्यानं इंग्रजी भाषेबद्दल प्रचंड न्यूनगंड होता. मात्र अशातच त्याच्या हातात बाबासाहेबांची इंग्रजी भाषेतील भाषणं, लेखन वाचायला मिळालं. बाबासाहेबांचं इंग्रजी वाङ्मय वाचून त्याच्यात कमालीचा आत्मविश्वास निर्माण झाला. यातून जय चौधरीचं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व निर्माण झालं.
बल्लारपूर ते स्कॉटलंड : इंग्रजी भाषेवर प्रभुत्व निर्माण झाल्यानं जयला काहीही अशक्य नव्हतं. अशातच त्याला जगातील एक सर्वाधिक प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या विद्यापीठाच्या यादीत येणाऱ्या एडीनबर्ग विद्यापीठाबाबत समजलं. इथं उच्च शिक्षण घेण्याचं त्यानं ठरवलं. विद्यापीठानं घेतलेल्या निवड चाचणीत जय उत्तीर्ण झाला. डेटा इनईक्वालिटी अँड सोसायटी या विषयात तो उच्चपदवी घेणार आहे. तसंच त्याला विदेशात उच्च शिक्षणासाठी राज्य शासनाची राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती मिळाली. हा अभ्यासक्रम हा एक वर्षाचा असून याचा सर्व खर्च महाराष्ट्र शासन करणार आहे.
परत येऊन करणार तळागाळातील विद्यार्थ्यांना मदत : एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून आल्यानंतर आपण चंद्रपूर, गडचिरोलीतील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जागृत करणार. तसंच यासाठी लागेल ती मदत आपण करणार, असं जयनं इटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं.
हेही वाचा -
- NAAC Assessment : शेकडो महाविद्यालयांची मान्यता रद्द होण्याची शक्यता, 'नॅक' मूल्यांकन नसल्यामुळं कारवाईचे आदेश
- Teachers Day २०२३ : एकविसाव्या शतकात गुरुकुल पद्धतीचं शिक्षण देणारी शाळा; फी फक्त १ किलो तांदूळ, वाचा स्पेशल स्टोरी
- Apply for Student visa : अभ्यासासाठी परदेशात जायचयं ? असा करा व्हिसासाठी अर्ज