चंद्रपूर : कोणत्याही गावाच्या विकासासाठी एका सक्षम नेतृत्वाची गरज असते. अशाच एका महिला सरपंचामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे नाव देशात उंचावले आहे. गावात पाण्यासाठी वणवण फिरावे लागायचे, मात्र चंद्रकला मेश्राम या सक्षम महिला सरपंचाच्या सक्षम आणि ठोस प्रयत्नाने संपूर्ण गाव जलयुक्त झाले आहे. जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरी नळ जोडणी करण्यात आली. याची दखल थेट राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. देशाच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चंद्रकला मेश्राम यांचा सत्कार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यातून केवळ दोन सरपंचांची निवड झाली आहे, यामध्ये चंद्रकला मेश्राम या एक आहेत.
प्रत्येक घरी नळ जोडणीचे मिशन : केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने देशातील प्रत्येक घरी नळ पोहचविण्याचे लक्ष ठेवले आहे. जल जीवन मिशन अंतर्गत हे काम सुरू आहे. या मिशन अंतर्गत राज्यात झालेले असाधारण काम प्रत्येक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मागविण्यात आले. 100 टक्के नळ जोडणी कुठे यशस्वी झाली, याबाबत देखील माहिती राज्य सरकारने मागितली होती. चंद्रपूर जिल्हा परिषदेने ब्रम्हपुरी तालुक्यातील लाखापूर गावातील सरपंच चंद्रकला मेश्राम यांचा प्रस्ताव पाठवला. हा प्रस्ताव दिल्ली येथे पाठविण्यात आला. त्यानुसार राज्यातून चंद्रकला मेश्राम आणि कोल्हापूर येथून एक महिला अशा केवळ दोन जणांची निवड यात करण्यात आली.
'असा' झाला कायापालट : सायगाटा आणि लाखापूर ही गट ग्रामपंचायत आहे. लाखापूर गावाची लोकसंख्या ही 528 असून 141 कुटुंब आहेत. गावाच्या बाजूला एक छोटा नाला आणि त्याबाजूला लागून विहीर आहे. मात्र विहिरीत पाणी कमी असल्यामुळे नागरिकांना वणवण फिरावे लागायचे. जल जीवन मिशन अंतर्गत गावात काम सुरू होणार होते. यासाठी चंद्रकला यांनी पुढाकार घेतला. पंचायत समितीचे अभियंता मेश्राम यांनी यासाठी मोठे सहकार्य केले. कुठल्याही अडचणीच्या वेळी ते धावून यायचे. त्यामुळेच हे स्वप्न सत्यात उतरले. विहिरीत बोअर घेतल्यापासून पाणी मुबलक यायला लागले. 141 पैकी 103 घरी नळ जोडणी करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते सत्कार : या यशस्वी प्रयोगाची दखल घेत चंद्रकला मेश्राम यांना लाल किल्ला, दिल्ली येथे स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजीच्या समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेश्राम यांचा सत्कार होणार आहे. दिल्ली येथे होणाऱ्या समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी सरपंच चंद्रकला मेश्राम आणी त्यांचे पती यांना उपस्थित राहण्याबाबतचे निमंत्रण केंद्र शासनाकडून देण्यात आले आहे. या कार्यक्रमाला चंद्रपुर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) नुतन सावंत यांना महाराष्ट्र राज्याकडून या कार्यक्रमाचे नोडल अधिकारी म्हणुन नियुक्त करण्यात आले आहे. मनुष्यबळ विकास तज्ज्ञ बंडू हिरवे यांचीदेखील सोबत असणार आहे.
चंद्रकला मेश्राम यांची प्रतिक्रिया : याबाबत चंद्रकला मेश्राम यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हा अविस्मरणीय क्षण असणार असल्याचे सांगितले. देशाचे पंतप्रधान यांच्याकडून आपला सत्कार होणार ही कुठल्याही भारतीयांसाठी गर्वाची बाब आहे, असे त्या म्हणाल्या. त्यांनी त्यांच्या दमदार कामगिरीमुळे चंद्रपूरचा डंका संपूर्ण देशात गाजवला आहे.
हेही वाचा :