चंद्रपूर - जिल्ह्यातील वेगवेगळ्या कारवायांमध्ये जप्त केलेला दारू साठा गोंडपिपरी पोलिसांनी रोड रोलर चालवून नष्ट केला. नष्ट केलेल्या दारुची किंमत अंदाजे ६७ लाख २७ हजार रुपये एवढी आहे. मागील तीन वर्षात केलेल्या कारवाईत गोंडपिपरी पोलिसांनी दारु साठा जप्त केला होता.
हेही वाचा - वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून वनरक्षकाची आत्महत्या, कर्मचाऱ्यांचे आंदोलन
जिल्हाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गोंडपिपरी तालुक्याला तेलंगणा राज्याची सीमा लागून आहे. दारूबंदीनंतर तेलंगणातून मोठ्या प्रमाणात गोंडपिपरी तालूक्यात दारूची तस्करी सूरु होती. अवैधरित्या दारु बाळगणाऱ्यांवर गोंडपिपरी पोलिसांनी धडक कारवाईची मोहिम राबविली होती. या कारवाईत जवळपास ६७ लाख २७ हजारांचा दारू साठा जप्त करण्यात आला होता. मंगळवारी गोंडपिपरीचे ठाणेदार संदिप धोबे, उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम सहायक निरीक्षक एस.एन. आक्केवार,पोलीस हवालदार सत्यवान सुरपाम, प्रफुल कांबडे, खुशाल गौरकर पंच कैलास नेताम, शैलेश झाडे यांच्या उपस्थित रोड रोलर चालवीत हा दारू साठा नष्ट करण्यात आला.