चंद्रपूर - विरुरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी केलेल्या कारवाईत 2 लाख 43 हजार रुपयांची 2115 लीटर गावठी दारू व सडवा जप्त करून नष्ट करण्यात आला. या कामी वापरण्यात आलेले 11 हजार 600 रुपयांचे साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची चांगलीच पळापळ होत आहे. संचारबंदी तोडणाऱ्यांवर पोलीस विशेष लक्ष ठेवून आहेत. यातच अवैध दारू विक्रेत्यांनी पोलिसांची डोकेदुखी वाढवलीय. संचारबंदीत अवैध दारू विक्रीला उत आला आहे. सलग तिसऱ्या दिवशी विरुर पोलिसांनी दोन लाख 43 हजारांची दारू जप्त केली. सध्या पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले अन्य पाचजण फरार आहेत.
लॉकडाऊनमध्ये विरुर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावात मोठ्या प्रमाणात गावठी दारूची तस्करी सुरू आहे. दारू तस्करीवर आळा घालण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांचा मार्गदर्शनात ठाणेदार कृष्णा तिवारी व उपनिरीक्षक सदानंद वडतकर पाळत ठेऊन आहेत. तीन दिवसांपासून विरुर पोलिसांनी राबवलेल्या धडक मोहिमेत लाखो रुपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली आहे.