चंद्रपूर - शेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वहानगावात दारू विक्री व साठवणूक करण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे पोलिसांनी झाडाझडती घेतली असता १९ हजाराची दारू व एक बारा बोअरची बंदूक आढळून आली. प्रकरणी अजितसिंग अंर्देले व जगदीपसिंग भोंड यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
जिल्ह्यात दारुबंदी घोषित होऊनही वहानगाव येथे अवैध दारू विक्री व वाहतूक मोठया प्रमाणात होत आहे. याविरोधात गावात आंदोलनेसुद्धा झाली. पोलीस विभागाकडून या अवैध दारू विक्रीवर प्रतिबंध घालण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत. अशात शेगाव पोलिसांना वहानगावात अवैध दारू विक्री व साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली. यानंतर ठाणेदार सुधीर बोरकुटे आपल्या कर्मचाऱ्यांसह संबंधित ठिकाणी दाखल झाले. संशयित अजितसिंग मानसिंग अंद्रेले याच्या घराची पोलिसांनी तपासणी केली. यावेळी १९ हजार रूपयाची देशी दारू हस्तगत करण्यात पोलिसांनी यश आले.
मुद्देमालासह अजितसिंग अंद्रेले याला अटक करण्यात आली. त्यांनतर कसून चौकशी केली असता पळसगाव जाट येथील मूळ रहिवाशी असलेल्या जगदीपसिंग छोटुसिंग भोंड याच्याकडे एक बारा बोअरची सिंगल बॅरल बंदूक आढळली. बंदुकीसह आरोपी जगदीप भोंड याला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला . ही कारवाई ठाणेदार सुधीर बोरकुटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण जाधव, अशोक क्षिरसागर यांनी केली.