चंद्रपूर - कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात 10 सप्टेंबर ते 13 सप्टेंबरपर्यंत 'जनता कर्फ्यू' लावण्यात आला. यादरम्यान संपूर्ण शहर बंद असणार आहे. मात्र यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. 12 सप्टेंबरला ग्रामीण बँकेच्या प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठीची परीक्षा ठेवण्यात आली आहे. जिल्ह्याचे मुख्यालय म्हणून केवळ चंद्रपूर शहरात ही परीक्षा केंद्र आहेत.
सकाळी आठ वाजता शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना पोहोचायचे आहे. तर शेवटची परीक्षा संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत चालणार आहे. जिल्ह्यात ज्या बसेस सुरू आहेत त्याचे वेळापत्रक परीक्षेच्या वेळेशी जुळून येणारच असे नाही. सोबत सोशल डिस्टन्सिंग म्हणत बसमध्ये केवळ 22 जणच बसू शकतात. त्यात नंबर हुकला तर परीक्षाही मुकली. चंद्रपूर बंद असल्याने या ठिकाणी खाण्या-पिण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नासणार आहे. अशावेळी नेमके करायचे काय, हा मोठा पेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर आहे.
देशातील विविध बँकांची पदभरती आयबीपीएस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन) राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. यावर्षी 12 सप्टेंबरपासून ही परीक्षा सुरू होणार आहे. 40 मिनिटांचा हा ऑनलाइन पेपर असणार आहे. यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षा केंद्र उपलब्ध करण्यात आली आहेत. अशा वेळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच आहे. चिमूर, ब्रम्हपुरी, पोंभुर्णा, जिवती, कोरपना अशा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेवर पोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कारण त्यासाठी प्रशासनाकडून काहीही विशेष सुविधा नाही. मुख्य शहराच्या ठिकाणी पोहोचल्यानंतरही शहर पूर्ण बंद असल्याने आपल्या परीक्षाकेंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना पायीच अंतर तुडवावे लागेल.
याबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी ओळखपत्र असलेल्या विद्यार्थ्यांची कुठेही अडवणूक होणार नसल्याचे सांगितले. याबाबत पोलीस प्रशासनाला सूचना केल्याचे ते म्हणाले. मात्र या व्यतिरिक्त या विद्यार्थ्यांना कोणतीही वेगळी सुविधा नाही.