चंद्रपूर - जिल्ह्यात एकामागून एक पावसाचे थैमान सुरू आहे. मागील चोवीस तासांत जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे तिसऱ्यांदा पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आता याचा फटका मूल शहराला बसला आहे. या शहरातील अनेक घरांत पाणी घुसले आहे. तर, इरई धरणाचे सातही दरवाजे जवळपास दीड मीटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे, चंद्रपुरात शहरातील सखल वस्त्यांत पुन्हा पाणी शिरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बाबूपेठ येथील पंचशील चौकात घराची भिंत कोसळून मायलेक गंभीर जखमी झाले. मूल, सावली तालुक्यात दमदार पाऊस झाला. अंधारी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने मूल - चंद्रपूर, सावली - जिबगाव - हरांबा हा मार्ग बंद झाला आहे.
नदी काठावरील आठ वस्त्यांना सतर्कतेचा इशारा - जुलै महिन्यात जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले. १० ते १८ जुलैदरम्यान जिल्हाभरात संततधार पाऊस झाला. नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे. धरणाचेही दरवाजे उघडण्यात आल्याने जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली. मात्र, शुक्रवारी (ता. २२) रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढला. रात्रीपासून पाऊस सुरूच आहे. पावसामुळे इरई धरणाचे सातही दरवाजे १.२५ मीटरने उघडण्यात आले. त्यामुळे, प्रशासनाने नदी काठावरील आठ वस्त्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
घरावर बाजूच्या घराची भिंत कोसळली - शनिवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास बाबूपेठ येथील पंचशील चौकात राहणाऱ्या बारसागडे यांच्या घरावर बाजूच्या घराची भिंत कोसळली. या घटनेत आई आणि दोन छोटी मुले जखमी झाली. मंजू बारसागडे, आर्यन बारसागडे आणि प्रशिक बारसागडे अशी जखमींची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावर, शहर संघटक रुपेश पांडे, सविता दंडारे, बादल हजारे, प्रतिक हजारे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आमदार किशोर जोरगेवार यांनी रुग्णालयात जावून जखमी परिवाराची भेट घेतली. जखमींना आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध करून देण्याच्या सूचना डॉक्टरांना केल्यात. शासनातर्फेही या कुटुंबाला मदत मिळवून देण्यासाठी घटनेचा अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागाला केल्या आहेत.
संततधार पावसाने मूल शहरातील वस्त्या जलमय - रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने मूल शहरातील अनेक वस्त्या जलमय झाल्या आहेत. चिंतावार ले-आऊट, उपजिल्हा रुग्णालयाकडील भागातील अनेक घरात पाणी शिरले आहे. वानखेडे यांच्या घरापासून सोनवणे यांच्या घरापर्यंतचा मुख्य हायवे रस्ता काही काळ पाण्याने बंद झाला. दुर्गा मंदिराच्या मागून गेलेला डीपी रोड पूर्ण जलमय झाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या घरात पाणी शिरले आहे. दुर्गा मंदिर आवारातसुद्धा पाणी घुसल्याने पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अशीच स्थिती वॉर्ड क्रमांक चौदा येथेही आहे.
सिंदेवाही तालुक्यातील 9 गावांचा संपर्क तुटला - सिंदेवाही तालुक्यातील मोहाळीसह (नलेश्वर) नऊ गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली आली आहेत. सावली तालुक्यातील चारगाव, जांब, जीबगाव ,लोंढोली, बारसागड, मेहा बूज, मंगरमेंढा, निफंद्रा, पालेबारसा, पाथरी, थेरगाव या परिसरातील नाल्यांना पूर येऊन रहदारी बंद झाली आहे. सकाळपासून सुरू आलेल्या पावसाने धान शेतीचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले. पुराच्या पाण्याने शेतात पाणी जमा होऊन रोवणी केलेले धान पीक पाण्यात बुडाले आहे. जिवती येथून नगराळा - गडचांदूर मार्गे जाणारी वाहतूक बंद आहे. पावसामुळे अंमलनाला तलावाजवळील नोकरी या गावाजवळ नाल्याला पूर आला. या मार्गावरची वाहतूक बंद झाली आहे.
सहा जण थोडक्यात बचावले - मूल तालुक्यातील बेंबाळ येथील वॉर्ड क्रमांक तीनमधील रहिवासी विठ्ठल गजानन वाढई, परशराम विठ्ठल वाढई यांचे घर शुक्रवारी रात्री दोन वाजतादरम्यान पडले. यावेळी घरात कुटुंबातील सहा सदस्य होते. मात्र, सुर्देवाने त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. परंतु, मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. वाढई यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे.