चंद्रपूर- सायबर गुन्ह्यांचा छडा लावण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस विभागालाच आता हॅकर्सनी थेट आव्हान दिले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांचे पोलीस विभागाचे अकाऊंट हॅक करून लोकांना थेट पैशांची मागणी केली धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात अद्याप आरोपीला अटक होऊ शकली नाही.
आरोपीला पकडणे आता पोलीस विभागाच्या प्रतिष्ठेचा विषय-
हल्ली ऑनलाइन फसवणूकीच्या प्रकरणात कमालीची वाढ झाली आहे. बँक अकाउंट, फेसबुक अकाऊंट, व्हाट्सअप, फोनपे, गुगलपेचा उपयोग करून लोकांना लाखोंचा गंडा घातला जात आहे. अशा फसवणूकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलीस विभागाकडून केले जाते. आपले पासवर्ड, ऑनलाईन विषयी महत्वाची माहिती कुणालाही देऊ नये, असे सांगण्यात येते. मात्र, असे करीत असताना थेट पोलीस विभागालाच आव्हान देण्याचे काम एका हॅकरने केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांचे पोलीस विभागाचे अकाउंट एसपी चंद्रपूर या नावाने आहे. यातील प्रोफाइल आणि फोटोची कॉपी करून याच नावाने बनावट फेसबुक आयडी तयार करण्यात आला. त्याच्या फ्रेंड रिक्वेस्ट अनेकांना पाठविण्यात आल्या. यावेळी फेसबुक मेसेंजरवर अनेकांशी संवाद साधून आपण जिल्हा पोलीस अधीक्षक बोलतोय. आपल्याला पैशांची अडचण आहे. त्यासाठी गुगलपे किंवा फोनपेवरून पैशे पाठविण्याची मागणी करण्यात आली. थेट पोलीस अधिक्षक आपल्याला पैशांची मागणी करत आहेत, हे बघून अनेक जण गोंधळात पडले. काहींनी या संवादाचा स्क्रीनशॉट मारून सोशल मीडियावर शेअर केला. त्यामुळे हा गोंधळ लक्षात आला. यावर पोलीस विभागाने सतर्क होऊन रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकाराबद्दल आज पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा केला. याबाबत पोलीस तपास करत असून लवकरच आपण आरोपींचा छडा लावू, असे त्यांनी सांगितले आहे. मात्र, ज्यांच्यावर सुरक्षा करण्याची जबाबदारी आहेत, ते देखील ऑनलाईन फसवणूकीपासून अलिप्त नाही. हेच या माध्यमातून दिसून येत आहे. त्यामुळे या आरोपीला पकडणे आता पोलीस विभागाच्या प्रतिष्ठेचा विषय झाला आहे.