चंद्रपूर - संगणक चालक असलेल्या ग्रामपंचायत सदस्याने संगणक संच आपल्या मालकीच्या कृषी केंद्रात नेले. ऐवढ्यावरच न थांबता पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे विनामुल्य आधार लिंकीग करायचे होते. मात्र संगणक चालकाने प्रत्येक लाभार्थ्यांकडून 60 रुपये उकळल्याचा संतापजनक प्रकार गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथे घडला आहे. लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतकडे याबाबत तक्रार केली आहे. कोरोनाच्या संकटात बेरोजगार झालेल्या गरीब लाभार्थ्यांची लूट करणाऱ्या या प्रकारावर सर्वस्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.
राजूरा विधानसभेतील धाबा येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी पाचशे लाभार्थ्यांची ड यादी ग्रामपंचायतेला प्राप्त झाली. या यादीतील प्रत्येकच लाभार्थ्याचे आधार लिंकीग करायचे होते. यासाठी शासनाकडून कुठल्याही प्रकारचे देय आकारण्यात आलेले नाही. असे असताना ग्रामपंचायतचे संगणक चालक शालिनी सांगडे-तिमाडे यांनी प्रत्येक लाभार्थ्यांकडून 50 ते 100 रुपये उकळल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे.
काही लाभार्थ्यांनी यांबाबत जाब विचारला असता, मी समाजसेवा करायला बसली नसल्याचे उद्दट उत्तर मिळाले. शालिनी सांगडे या ग्रामपंचायत सदस्य आहेत. विरोध केल्यास आपले घरकुल नामंजूर केल्या जाईल या भितीने लाभार्थी गप्प होते. विशेष म्हणजे ग्रामपंचायतेतील संगणक कक्षात बसून आधार लिंक करायची होती. मात्र सांगडे यांनी संगणक कक्षातील संच थेट आपल्या मालकीच्या कृषी केंद्रात नेवून ठेवले. कृषी केंद्रातूनच त्या कारभार करायच्या. या प्रकाराला वैतागलेल्या लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतेकडे तक्रार केली. ग्रामपंचायतने 22 जूनला झालेल्या मासिक सभेत शालिनी सांगडे यांना निलंबित करण्याचा ठराव घेतला आहे.
...तर आमरण उपोषण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोजगाराची मोठी वाणवा आहे. सामान्य माणसांची आर्थिक कोंडी झालेली आहे. अशा बिकट स्थितीत गरीब लाभार्थ्यांकडून पैसे उकळणाऱ्या संगणक चालकावर तात्काळ कार्यवाही करा अन्यथा आमरण उपोषण करु असा इशारा विश्वेश्वर हिवरकर, संजय चंदनगीरीवार, राकेश चंदनगीरीवार, दीपक येलमुले, रविंद्र येलमुले, संजय हिवरकर, गजानन हिवरकर, विनोद भुसारी, रुपेश नेवारे या लाभार्थ्यांनी केली आहे.