चंद्रपूर - गोवंशाचे जीव वाचवण्यासाठी आणि त्यांचे सवर्धन करण्यासाठी गोशाळा उघडण्यात आल्या. मात्र, त्याच गोशाळेतील मृत जनावरांना उघड्यावर फेकून देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे नियम धाब्यावर बसवत मृत जनावरे जंगलालगत फेकण्यात येत आहेत.
ही मृत जनावरे जंगलालगत फेकण्यात येत असल्याने जंगलातील हिंस्र प्राणी मृत जनावारांकडे आकृष्ट होत आहेत. हे नागरीक आणि वन्यप्राण्यांसाठी अत्यंत धोकादायक आहे. अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असला तरी अद्याप यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.
काही दिवसांपूर्वी राजुरा तालुक्यातील विरुर येथे अवैधरित्या गोवंशांची तस्करी करताना आरोपीना पकडण्यत आले होते. यामध्ये जप्त करण्यात आलेली जनावरे लोहारा येथील उज्वल गोरक्षण संस्था येथे आणण्यात आली. यादरम्यान १७ जनावरांचा वाहतुकीदरम्यानच मृत्यू झाला. या जनावरांची रीतसर विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही गोरक्षण संस्थेची होती. मात्र, त्यांनी असे न करता ही सर्व मृत जनावरे गावाजवळच आसलेल्या जंगलात फेकून दिली.
या परिसरात वाघ, बिबट्या यांसारख्या हिंस्र प्राण्यांचा मुक्त वावर आहे. मानवी वस्तीदेखील या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर आहे. अशावेळी गावकऱ्यांना मृत जनावरांच्या दुर्गंधीचा त्रास होत होता. काही दिवसांपूर्वी एक वाघ या मृत जनावरांना खाण्यास आला होता. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. अशा वेळी कोणीही या मृत जनावरांवर विषप्रयोग करू शकतो. जंगल परिसरात अशी जनावरे फेकून देने धोकादायक आहे आणि हे नियमांविरूद्ध आहे. हे उघडकीस आले असले तरी गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याची माहिती मीळाली आहे. मात्र, अद्याप वन विकास महामंडळाने गोशाळेवर कुठलीही कारवाई केलेली नाही. आम्ही स्वतः याची चाचपणी केली असता जंगल परिसरात अनेक ठिकाणी चार-पाचच्या संख्येने ही मृत जनावरे टाकण्यात आली आहेत. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. काही ठिकाणी हिंस्र प्राण्यानी या जनावरांना ओढून नेल्याचेही दिसून आले. यावर habitat conservation society या पर्यावरण संस्थेने तीव्र आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे दिनेश खाटे यांनी केली आहे.