चंद्रपूर- ग्रामगीता देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची तपोभूमी म्हणून गोंदेडा प्रसिद्ध आहे. मात्र, येथील रोजगार हमी़ योजनेच्या मजुरांना त्यांची मजुरी तीन वर्षांपासून मिळालीच नसल्याने या मजुरांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. या प्रकरणी मजुरांनी रोजगार सेवकावर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
चिमूर पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या गोंदेडा गट ग्रामपंचायती मध्ये सन २०१७ ते २०२० पर्यंत महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बोडी खोली करणाचे काम करण्यात आले. मात्र,आजतागायत त्या कामाची मजुरी मिळाली नसल्याने मजुरांनी रोजगार सेवकावर रोष व्यक्त केला आहे. ग्रामपंचायतीकडे मजुरांनी थकीत मजुरी देण्याची मागणी केली आहे.
रोजगार सेवकाने मजुरीचा मस्टर अजुनही काढला नाही, असा आरोप मजुरांनी केला आहे. ग्रामपंचायतीने थकीत मजुरी तात्काळ द्यावी, जेव्हा मजुरी देण्यात येईल तेव्हाच रोजगार सेवकाचे मानधन देण्यात यावे, अशी मागणी मजुरांनी केली आहे.मजुरांना मजुरी पासुन वंचित ठेवणाऱ्याला रोजगार सेवकास त्याच्या पदावरून काढण्यात यावे, अशीही मागणी सर्व वंचित मजुरांनी ग्रामपंचायतीला निवेदनाद्वारे केली आहे.