चंद्रपूर : वरोरा शहर हे आता खुनाचे शहर झाले आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडायला लागला आहे. अगदी दोन दिवसाच्या अंतराने शहरात दुसरा खून झाला आहे. या परिसरात सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांमुळे या घटना घडत असल्याच्या चर्चेला आता पेव फुटला आहे. दोन दिवसांपूर्वी गांधी चौकात भर दिवसा निलेश ढोक नावाच्या मुलाने एका 26 वर्षीय आलम नावाच्या तरुणाचा खून केला होता. त्याचा तपास सुरू असतानाच आता दुसरा खून झाल्याने वरोरा शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत.
15 मे रोजी सायंकाळी सव्वा सात वाजताच्या दरम्यान दोन ते तीन अज्ञात व्यक्तींनी अंबादेवी वार्ड येथील महादेव मंदिर जवळ असलेल्या झोपडीत साजिद शेख नावाच्या तरुणाचा गोळ्या झाडून खून केला असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. मृत साजिद शेख हा आझाद वार्डात राहत असून तो सट्टा चालवत असल्याची माहिती समोर येत आहे. आज तो एकटाच असल्याच्या फायदा घेत दोन ते तीन आरोपींनी त्याच्यावर सहा राऊंड माऊजर बंदुकीने दोन गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक छातीत तर दुसरी कानाखाली मारली. विशेष म्हणजे आरोपींनी आपले शस्त्र (बंदूक ) मृतादेहाजवळ ठेवून पोबारा केला. आरोपी हे तोंडाला फडके बांधून असल्याने त्यांचा शोध आता वरोरा पोलीस घेत आहे.
हेही वाचा - प्रेमविवाह केल्याने तरुणीसमोर नवऱ्याचा डोक्यात घातली फरशी, व्हिडिओ झाला व्हायरल