चंद्रपूर - खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात देशभर साजरा केला. परंतु, चर्चा मात्र होती ती गडचांदूर येथे झालेल्या फळवाटपाची. सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ज्या रुग्णाला फळवाटप केले, तोच रुग्ण काँग्रेस नेत्यांसोबत हातात बॅनर पकडून फोटोत दिसत आहे. फळवाटप केलेला व बॅनर पकडणारा एकच व्यक्ती असून काॅग्रेस नेत्यांच्या ही बाब लक्षात कशी आली नाही, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा प्रकार समोर येताच समाजमाध्यमांवर चांगलेच चिमटे काढले जात आहेत. तर, उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांचा पोपट झाल्याची बोचरी टिका केली जात आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते, खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध उपक्रम काँग्रेस पक्षाकडून राबवले जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील कार्यकर्त्यांनीही वाढदिवस साजरा केला. गडचांदूर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ, मास्कचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे फोटो धडाधड समाजमाध्यंमावर टाकल्या गेले. मात्र, या फोटोत ज्या रुग्णाला फळवाटप केले तोच रुग्ण रुग्णालयाबाहेर काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत बॅनर पकडून उभा दिसत आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या अधिकाऱ्यांसोबत सदर रुग्णाने बॅनर पकडून आपले फोटोही काढून घेतले.
काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा हा चालूपणा समाजमाध्यमातून उघड झाला आणि विरोधकांना आयते कोलीत सापडले. त्यांनी या प्रकाराची खमंग चर्चा घडवून आणली. प्रसिध्दीसाठी कार्यकर्त्यांनी लांब उडी मारली मात्र, अर्ध्यातच ते जमिनीवर पडले. फळवाटपाच्या निमित्ताने घडलेल्या या प्रकारावरुन काँग्रेस पदाधिकार्यांचे सोशल मिडीयातून चांगलेच चिमटे काढले जात आहेत.