चंद्रपूर - मूल येथे एक कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर जिल्ह्यातील भद्रावती येथील ४९ वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या कोरोनाबाधित नागरिकामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह बाधिताची संख्या २६ झाली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचे हैदराबाद येथील नालाकुंडा जिल्ह्याचे रहिवासी असणारे हे गृहस्थ सध्या भद्रावती येथे कार्यरत आहेत. १ जून रोजी ते हैदराबादवरुन भद्रावती येथे जाण्यासाठी निघाले होते. त्यांची तपासणी चंद्रपूर येथील शकुंतला लॉन येथे करण्यात आली. ते एकटेच घरी राहत असल्यामुळे त्यांना गृह अलगीकरण करण्यात आले. ३ जून रोजी वरोरा येथे त्यांचा स्वॅब घेण्यात आला.
गुरुवारी सायंकाळी त्यांचा स्वॅब पॉझिटीव्ह आला. त्यांना वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. आतापर्यंत २२ बाधित बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे २६ पैकी अॅक्टीव्ह बाधितांची संख्या आता ४ असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.