चंद्रपूर - ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात काळा बिबट्या आढळल्याने खळबळ उडाली. या बिबट्याचे पुन्हा एकदा दर्शन झाले आहे. रविवारी म्हणजे जागतिक वन्यजीव सरंक्षणदिनी हा बिबट्या दिसला होता.
पर्यटक आणि बिबट्याचे अंतर खूप असल्याने तसेच सायंकाळची वेळ असल्याने हा बिबट्या संपूर्णपणे काळा दिसून येत होता. मात्र, यानंतर ह्याच बिबट्याचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यात त्याचे समोरील ठिपके अधिक गडद, तर मागचे कमी गडद असल्याचे आढळून आले. व्हिडिओमध्ये हा बिबट्या रस्त्याच्या एका कडेला धावत होता. त्यामुळे हा बिबट्या काही वेगळी प्रजाती नसून, त्याच्यात मेलनिनचे प्रमाण असंतुलित झाल्याने तो काळा झाल्याचे सिद्ध झाले.
रविवारी जागतिक वन्यजीव सरंक्षणदिनी ताडोबातील पर्यटकांना पुन्हा या काळ्या बिबट्याचे दर्शन झाले. यात, हा बिबट जंगलात मुक्तविहार करताना दिसत आहे. मात्र, रस्त्याच्या कडेवर यातच तो थबकतो. आपल्या आजूबाजूची चाहूल घेत तो काही काळ तिथे थांबतो आणि मगच तो पुढे जातो. ह्या बिबट्याच्या दर्शनाने पर्यटक सुखावले. विशेष म्हणजे बिबट्या सहसा संध्याकाळच्या सुमारास बाहेर पडतो. मात्र, या व्हिडिओत तो दुपारच्या सुमारास मुक्तविहार करताना दिसत आहे.