चंद्रपूर - चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील चिमणीची सफाई करताना चार कामगार खाली पडून मोठा अपघात झाला. यात एका कामगाराचा मृत्यू झाला तर अन्य तिघांना गंभीर दुखापत झाली. हे कंत्राटी कामगार अडोरे कंपनीचे होते. या कामगारांना कुठलेही सुरक्षेची उपकरणे दिली नव्हती. त्यांना योग्य मोबदला देण्याची जबाबदारी कंपनीची आहे. मात्र कंपनीने त्यांना न्याय देण्यास पाठ दाखवली आहे. त्यामुळेे ही कंपनी आणि महाऔष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शिवसेनाप्रणित सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेनेने आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.
अडोरे या कंपनीचा मनमानी कारभार सुरू आहे. कामगारांना त्यांच्या न्याय्य हक्कानुसार वेतन देखील दिले जात नाही. कंत्राटी कामगारांना सुरक्षा उपकरणे उपलब्ध करून दिली जात नाही. याची मागणी केली असता त्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते, असा आरोप यावेळी करण्यात आला. कंपनीच्या या धोरणामुळे चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात अधिक अपघात होत आहेत. त्यामुळे या घटनांसंदर्भात कंपनी आणि मुख्य अभियंता यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येणार असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाप्रमुख बंडू हजारे, जिल्हा कार्याध्यक्ष कैलास तेलतुंबडे, सचिव अमोल मेश्राम, युनिट अध्यक्ष प्रफुल सागोरे, युनिट सचिव प्रमोद कोलारकर, मीरा काकडे, विक्रम जोगी, अमोल भट हे उपस्थित होते.
कंपनीचा कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यासाठी नकार -
या अपघातात गंभीर जखमी झालेले कंत्राटी कामगार देखील उपस्थित होते त्यांनी कंपनीत पुन्हा रुजू होण्यासाठी फिटनेस सर्टिफिकेट दिले आहे मात्र कंपनीने त्यांना कामावर घेण्यास स्पष्टपणे नकार दिला त्यामुळे या कामगारांना समोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
आमची जबाबदारी संपली -
याबाबत अडोरे कंपनीचे व्यवस्थापक राव यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या कामगारांची कुठलीही जबाबदारी घेण्यास नकार दिला. हे कंत्राटी कामगार होते. 76 हजारांचे कंत्राट होते मात्र या कामगारांच्या उपचारासाठी 20 लाखांचा आम्हाला खर्च आला. हे कामगार बरे झाले असले तरी आता आमच्याकडे कुठल्याही कंत्राटी जागा शिल्लक नाही. त्यामुळे आम्ही त्यांना कामावर घेऊ शकत नाही असे उडवाउडवीचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.