चंद्रपूर - शहरातील प्लास्टिक इंजिनियरिंग इन्स्टिट्यूट असलेल्या सिपेट संस्थेच्या वसतिगृहातील ५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. शहरातील नागपूर मार्गावरच्या एका खाजगी इमारतीत हे वसतिगृह असून काल रात्री कंत्राटदाराने पुरविलेल्या जेवणातून ही विषबाधा झाल्याचे बोलले जात आहे.
विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, अशा एकूण ५० जणांना उलटी आणि मळमळ होत असल्याने शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. सिपेट संस्थेच्या प्रमुखांनी या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करून दोषी कंत्राटदारांवर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. विद्यार्थ्यांनी या वसतिगृहात निकृष्ट दर्जाचे भोजन पुरवले जात असल्याची तक्रार केली आहे. सध्या पोलिसांनी या विद्यार्थ्यांचा जबाब नोंदविण्याची कारवाई सुरू केली आहे.