मुंबई : राज्यात मानव आणि वन्य प्राणी यांच्यातील संघर्ष वाढतानाच दिसतो आहे. 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 या संपूर्ण वर्षभरात केवळ चंद्रपूर जिल्ह्यात वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडलेल्या व्यक्तींची संख्या धक्कादायक आहे. केवळ चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात वर्षभरात 24 व्यक्तींना प्राण गमवावा लागला आहे तर बिबट्याच्या हल्ल्यात 7 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची कबुली वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
किती प्राणी मरण पावले? वर्षभराच्या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यामधील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि चंद्रपूर विभागात नैसर्गिक कारणामुळे नऊ वाघ, तीन बिबटे, सहा चितळ, एक नीलगाय, एक अस्वल आणि पाच मोर मरण पावले आहेत. परस्परांशी झुंज देताना दोन वाघ मृत्यूमुखी पडले आहेत. अपघातामुळे दोन वाघ, चार बिबटे, पाच चितळ, दोन नीलगाई, आणि दोन अस्वल मरण पावली आहेत. विद्युत प्रवाहामुळे एका वाघाला आपला जीव गमवावा लागला आहे. तर शिकारीमध्ये पाच चितळ तीन रानडुक्कर आणि दोन सायाळ या वन्य प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. वन्य प्राणी यांच्या संरक्षणासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करीत असून त्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
प्राणी संरक्षणासाठी उपाय योजना? वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी वनक्षेत्रात गवत, कुरण आणि मृदा जलसंधारणाची कामे करून त्या ठिकाणी गवत आणि चराईयोग्य प्रजातींची लागवड केली जाते. वन्य प्राण्यांसाठी वनक्षेत्रात कृत्रिम पानवठे निर्माण करून पाण्याची व्यवस्था करण्यात येते. अति संवेदनशील क्षेत्रात बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून जंगलात आवश्यक त्या ठिकाणी संरक्षण व निरीक्षण मनोरे तयार करण्यात आले आहेत वन्यजीवांच्या तात्काळ उपचारासाठी बचाव केंद्र आणि उपचार केंद्र तयार केली असून विद्युत प्रवाह मुळे वाघांचे आणि अन्य प्राण्यांचे मृत्यू होऊ नये, म्हणून वनविभाग आणि वीज वितरण विभाग यांच्याद्वारे सनियंत्रण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. प्राण्यांची शिकार होऊ नये यासाठी काळजी घेतली जात असून वन्यजीव गुन्ह्यांसंबंधात माहिती संकलन करण्याकरिता खबऱ्याला बक्षीस देण्यासाठी गुप्त सेवानिधीची तरतूद करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
असा टाळणार मानव-वन्य प्राणी संघर्ष: वन्य प्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर अनेक उपाययोजना करण्यात येत असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. वन्य प्राणी आणि त्यांच्या हालचाली नियंत्रण करून गावांमध्ये त्याबाबत जनजागृती करण्यात येते. या क्षेत्रात प्राथमिक बचाव गटाची निर्मिती करण्यात आली आहे. मानवी जीवितास हानी पोहोचवणाऱ्या वन्यप्राण्यास जेरबंद करण्यात येते. तसेच अभयारण्यलगतच्या दोन किलोमीटर परिसरातील गावे आणि व्याघ्र भ्रमण मार्गातील गावांची जनवन विकास योजनेअंतर्गत निवड करून आतापर्यंत १२८७ गावांमध्ये वनांवरील अवलंब कमी करण्यासाठी पर्यायी रोजगार निर्माण करण्याचे काम हाती घेतले असल्याची माहिती त्यांनी दिली. तर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना वीस लाख रुपये नुकसान भरपाई दिली जात असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.