चंद्रपूर - कोरपना तालुक्यातील सोनूर्ली गावातील एका शेतकऱ्याने सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शंकर बबन पारखी (वय, 32) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
शनिवारी सायंकाळी शंकर शेतात फवारणी करुन घरी परतला. यानंतर जेवन करुन तो बाहेर गेला. दरम्यान, रात्रीच्या वेळी त्याने विष पिले आणि तो घराच्या गच्चीवर जाऊन झोपला. यानंतर त्याच्या घरच्यांनी शोधाशोध केली असता, रात्री २ वाजता शंकर बेशुद्ध अवस्थेत गच्चीवर आढळला. शंकरला तत्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शंकरला मृत घोषित केले.
शंकर पारखी याच्याकडे आठ एकर जमीन आहे. वडील वृद्ध झाल्यामुळे संपुर्ण कुटुंबाची जवाबदारी एकुलता एक असलेल्या शंकरवर होती. मात्र, सततची नापिकी आणि वनसडी येथील इंडिया बँकेचे एक लाखाचे कर्ज यामुळे आलेल्या नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती शंकरच्या नातेवाईकांनी दिली. शंकरच्या मागे पत्नी, दोन मुले, आणि आई वडील असा परिवार आहे.