चंद्रपूर - सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विहिरगावातील शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली. धर्माजी किसन करमणकर (वय ६४)असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
![farmer suicide in chandrapur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mhchd01suicidevis_17082020131506_1708f_1597650306_391.jpg)
राजुरा तालुक्यातील विहिरगावात राहणाऱ्या शेतकरी धर्माजी किसन करमणकर यांनी स्वत:च्या शेतात रविवारी(दि.16 ऑगस्ट) सायंकाळी ४ वाजता विष घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने करमणकर यांना जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे हलवण्यात आले. काल पहाटे 6 वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
धर्माजी करमणकर हे अल्पभूधारक होते. त्यांच्या नावे तीन एकर शेती आहे. त्यांच्यावर बँक आफ इंडियाचे मागील वर्षातील पन्नास हजार रुपये पीक कर्ज थकीत आहे. मागील वर्षी झालेली नापिकीमुळे त्यांना यंदा पीककर्ज मिळाले नव्हते. यंदा पैसे उसने घेऊन त्यांनी शेती उभी केली होती. मागील काही दिवसांपासून ते मानसिक तणावात होते. रविवारी शेतातील कीटकनाशक घेऊन अखेर त्यांनी जीवन संपवले. त्यांचा मागे पत्नी, एक मुलगा व तीन मुली असा मोठा परिवार आहे. करमणकर यांच्या अकाली आत्महत्येने गावात हळहळ व्यक्त होत आहे.