चंद्रपूर - दहशतवाद हा केवळ मानवाशी निगडित नाही तर तो निसर्गाशीही निगडित आहे. पर्यावरण दहशतवाद हा त्यापैकीच एक. या पर्यावरण दहशतवादामुळे मानवाच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. यासाठी वेगळा विचार करणे आवश्यक आहे. अन्यथा सजीव सृष्टीला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागेल, असे मत पर्यावरण अभ्यासक प्राध्यापक योगेश दूधपचारे यांनी व्यक्त केले.
दूधपचारे यांनी जागतिक स्तरावर होत असलेल्या पर्यावरण बदलांविषयी गंभीर चिंता व्यक्त केली. दिल्लीमध्ये उच्च तापमानाचा 100 वर्षांचा विक्रम मोडीत निघाला त्याच ठिकाणी 119 वर्षांचा सर्वात कमी तापमानाचा विक्रमही मोडीत निघाला. एकाच शहरात हवामानातील हा विरोधाभास अत्यंत गंभीर आणि दखल घेण्यासारखी बाब आहे.
हेही वाचा - नाईट सफारीसाठी महिला गाईड; ताडोबा व्यवस्थापनाचा उपक्रम
ही परिस्थिती जगातील अनेक ठिकाणांची आहे. ऑस्ट्रेलियामध्ये वणवा पेटल्याने तेथील तापमान 50 डिग्रीपर्यंत गेले आहे. जंगल परिसंस्थेचा नाश होत आहे. सोमालिया देशात अन्नासाठी अराजकता पसरली आहे. भारतातही अशी परिस्थिती उद्भवू शकते. यापूर्वी पारंपरिक शेती करण्यात येत होती. मात्र, सध्याची परिस्थिती बघता यात देशपातळीवर अनेक बदल करण्याची गरज असल्याचे, प्राध्यापक दूधपचारे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी अमित वेल्हेकर यांना सांगितले.