चंद्रपूर - वनविभागाच्या जागेवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून वृक्षांची कत्तल करण्यात आली. खुद्द सरपंच पत्नी आणि त्यांचे माजी सरपंच पती यांनीच हा कारनामा केला. यावर कारवाई करण्याऐवजी वनविभाग मात्र, संथगतीने चौकशी करीत आहे. राजकिय दबाव असल्याने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण
सावली तालुक्यातील मौजा हिरापुर येथे नितीन गोहणे यांच्या मालकीची तीन ते चार एकर जमीन आहे. गोहणे हे ह्या गावाचे सरपंच राहिलेले आहेत तर त्यांच्या पत्नी देखील सद्यस्थितीत सरपंच आहेत. गोहणे कुटुंबाने आपल्या राजकीय वजनाचा फायदा घेत आजूबाजूच्या वनजमिनीवर अतिक्रमण सुरू केले. यादरम्यान त्यांनी तेथील वृक्षांची कत्तल केली. वनविभागाच्या अधिकारात येणाऱ्या भुक्रमांक 293, 295, 97 आणि 230 येथे हे अतिक्रमण केले. याबाबत प्रीती प्रकाश जवादे, सुधाकर क्षीरसागर, प्रभाकर राऊत, विनायक गेडेकर, बंडू मेश्राम यांनी 8 फेब्रुवारीला सावली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली. याची मौका चौकशी केली असता या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. परंतु सीमांकन झाले नसल्याने प्रत्यक्षात किती जमिनीवर अतिक्रमण झाले हे सिद्ध करण्यास अडचण येत असल्याचे स्पष्टीकरण मार्च महिन्यात वनविभागाने दिले. यानंतर वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तर देण्यात आली नाहीत असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. यानंतर 3 जूनला उपवनसंरक्षक यांना तक्रार देण्यात आली. या घटनेत भारतीय वन अधिनियम 1927 कलम 63 (ग) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
गरिबांना नियम तर माजी सरपंचांना सूट
या गावातील काही गरीब लोकांनी शेतीसाठी अतिक्रमण केले होते. त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात आली. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असताना वनविभाग मात्र माजी सरपंचांवर कारवाई करण्यास कुचराई करण्यात येत आहे, असा आरोपही करण्यात आला आहे.