चंद्रपूर - शहरांतर्गत कुठल्याही रस्त्याचे रुंदीकरण करताना त्या रस्त्याला अडथळा येणाऱ्या विजेच्या खांबांना हटविण्यात येते. मात्र, महापालिकेच्या हद्दीतील वडगाव प्रभागात एक विजेचा खांब रस्त्याच्या मधोमध मागील अनेक वर्षांपासून उभा आहे. हा खांब अपघाताला आमंत्रण देणारा खांब असून याकडे या प्रभागातील नेत्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत. याबाबत लोकप्रतिनिधींकडे विचारणा केली असता काहींनी मौन बाळगले तर काहींनी विषय भरकटवण्या प्रयत्न केला.
शहरातील झोन क्रमांक एक मधील वडगाव प्रभागातून चार दिग्गज लोकप्रतिनिधी निवडून आले आहे. चंद्रपूर शहराच्या प्रथम नागरिक महापौर राखी कंचर्लावार, आक्रमक शैली आणि अभ्यासू नेते म्हणून ओळख असलेले गटनेते पप्पू देशमुख, विरोधीपक्षनेत्या तसेच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सुनीता लोढिया आणि सातत्याने निवडून येणारे नगरसेवक देवानंद वाढई यांचा हा प्रभाग आहे. अशा दिग्गज नेत्यांच्या प्रभागात 2017 मध्ये आंबेडकर महाविद्यालय ते हवेली गार्डन चौकापर्यंत पूर्वीच्या रस्त्याचे विस्तारीकरण करून त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले.
दरम्यान, रस्त्याच्या मधोमध असलेले सर्व विजेचे खांब हटवून ते नव्या रस्त्याच्या बाजूला लावण्यात आले. मात्र, सिद्धार्थ हॉटेलचे मालक रणजितसिंग सलूजा यांच्या प्रशस्त बंगल्यासमोर असलेला विजेच्या खांबाला धक्का लावण्यात आला नाही, तो तसाच ठेवण्यात आला आहे. अपघाताला आमंत्रण देणाऱ्या या खांबाकडे सोयीस्कररित्या सर्वांनी दुर्लक्ष केले. आहे.
चंद्रपूर शहराच्या राजकारणात दिग्गज समजल्या जाणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून संपूर्ण शहरातील समस्यांकडे बारीक लक्ष असताना आपल्याच प्रभागातील ही मोठी बाब सुटली नसती. यात नक्कीच कुठेतरी पाणी मुरत आहे. ते कुठे मुरत आहे याची कल्पना प्रभागातील नागरिकांना आहे. रस्त्याच्या मधोमध असलेला हा खांब काही बड्या लोकांसाठी सुविधेचा झाला आहे. त्यांच्या गाड्या बाहेर लावण्यासाठी हा खांब सुरक्षा कवच म्हणून काम करीत आहे. मात्र, याची तक्रार करावी कशी हा पेच या दिग्गज नेत्यांसमोर आहे. म्हणूनच याबाबत या चारही लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला असता एकानेही ठोस भूमिका मांडत समाधानकारक असे उत्तर दिले नाही.
दिग्गज नेत्यांचे स्पष्टीकरण
महापौर राखी कंचर्लावार यांनी आपण याबाबत सुरुवातीलाच एमईसीबीला पत्र दिले आहेत. मात्र, त्याचा पाठपुरावा करणे ही माझी जबाबदारी नाही. ती महापालिका प्रशासनाची आहे, असे म्हणत आपल्याच अधिपत्यात असलेल्या प्रशासनावर बोट उचलून उलट आपल्याच कारभाराची पोलखोल केली आहे. जर महापौरांच्या सूचनेला प्रशासन जुमानत नसेल तर हे वैफल्य कुणाचे याचाही विचार करणे गरजेचे आहे.
खांब हटविण्यासाठी त्या खांबाची नेमकी माहिती द्यावी लागते. मात्र, अशी कुठलीही सूचना महापालिकेकडून आपल्याला प्राप्त झाली नाही, असे विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता त्यांचे म्हणणे आहे. गटनेते पप्पू देशमुख यांनी आपल्या कार्यकाळापूर्वी हे काम झाले होते. ही समस्या स्मरणात आली असून याचा तोंडी पाठपुरावा आपण विद्युत विभागाकडे करीत असल्याचे सांगितले. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सुनीता लोढीया यांनी जर याविरोधात नागरिकांनी तक्रार दिली तर आपण जनतेच्या पाठीशी असणार, असे सांगितले. तर नगरसेवक देवानंद वाढई यांनी ही समस्या विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली असून लवकरच हा खांब हटवला जाणार, असे त्या विभागाकडून सांगण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र, कुठलीही लिखित तक्रार आपण दिली नसल्याचे सांगितले. एकूणच या सर्व दिग्गज समजल्या जाणाऱ्या नेत्यांचे थातुरमातुर स्पष्टीकरण समस्येची पोलखोल करण्यास पुरेसे आहे. मात्र, या नादात प्रभागातील जनतेचा जीव वेठीस धरला जात आहे.
हेही वाचा - चोरट्यांनी लुटले गॅस सिलिंडरचे गोदाम; 102 सिलिंडर लंपास