चंद्रपूर - तळीराम गुरूजीला दारूची तलब आली. मग काय..! मद्याचे प्याले मनसोक्त गुरुजींनी पोटात ओतले. फुल्ल झालेल्या या शिक्षकाने विद्यार्थ्यांना खेळात गुंतवून शाळे जवळच असलेल्या शेताचा बांधावर पाय पसरले. गुरूजींचा या महाप्रतापाची माहिती गावभर पसरली. पोलिसांना बोलावले गेले. अखेर पोलिसांच्या मदतीने गुरुजींना 'प्रदीर्घ निद्रासना'तून जागे करण्यात आले. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा हा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात भंगारपेठ येथे सोमवारी घडला.
शाळेत कर्तव्यावर असलेला शिक्षकच दारूच्या नशेत धुंद असल्याचा प्रकार गंभीर प्रकार चंद्रपूरमधील गोंडपिंपरी तालुक्यात घडला आहे. शाळेवर शिक्षक असलेल्या या शिक्षकाने कर्तव्याचे भान विसरून शाळेच्या वेळेत प्रमाणाबाहेर मद्यपान केल्याने त्याला चालणेही अशक्य झाले होते. अशातच मग मुलांना खेळायला सुट्टी देऊन या शिक्षाने जवळच असलेल्या शेतात लोळण घेतली.
गटग्रामपंचायत भंगाराम तळोधी अंतर्गत येणाऱ्या भंगारपेठ गावात दोन शिक्षक कार्यरत आहेत. शाळेत एकूण 27 विद्यार्थी आहेत. अशातच या शाळेतील एक शिक्षक कामानिमित्त गैरहजर होते. त्या दिवशी शाळेत उपस्थित असलेल्या बोरकुटे नामक शिक्षकाने केलेल्या कारनाम्याची रंगतदार चर्चा तालुक्यात सुरू आहे. शाळेत येण्यापूर्वीच त्या शिक्षकाने दारू प्यायलेली होती. एवढ्यावरच न थांबता शाळेच्या वेळात दुपारनंतरसुद्धा त्यांने पुन्हा एकदा दारू प्यायल्याचे कळते.
दारूचा अंमल जास्त झाल्याने विद्यार्थ्यांना खेळायला लावून शिक्षकाने शेतातील बांधावर पाय पसरले. आणि तिथेच ते गाढ झोपी गेले. अखेर बऱ्याच वेळापासून बाहेर गेलेल्या शिक्षकाचा विद्यार्थ्यांनी शोधाशोध सुरू केला. या दरम्यान गावातीलच एका व्यक्तीला हे महाशय शेतीच्या बांधावर पडून असल्याचे दिसून आले. ही बाब वाऱ्यासारखी गावात पसरताच शाळेतील विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि गावकऱ्यांनी गुरुजींच्या दिशेने धाव घेतली.
एकत्र जमलेल्या गर्दीच्या कल्लोळानंतरही मद्यपी शिक्षक झोपेतून उठत नव्हते. अखेर शाळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हे प्रकरण गोंडपिपरी पोलिसांना फोनवरून सांगितले. पोलीस विभागाचे कर्मचारी भंगारपेठ गावात दाखल झाले. पोलिसांच्या माध्यमातून त्या तळीराम शिक्षकाला झोपेतून जागवण्यात आले. यानंतर त्या शिक्षकाला वैद्यकीय चाचणीसाठी गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात आणले गेले.