चंद्रपूर - खासगी प्रवासी वाहतूक क्षेत्रात दबदबा असलेल्या डीएनआर ट्रॅव्हल्समधून प्रवास करीत असताना ट्रॅव्हल्समधील कर्मचाऱ्याने एका युवतीचा विनयभंग केला. 25 फेब्रुवारीला हा प्रकार घडला, तर 28 फेब्रुवारीला अनेक तासांच्या प्रतिक्षेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. या दरम्यान डीएनआर ट्रॅव्हल्सच्या व्यवस्थापनाने दाखविलेल्या असंवेदनशीलतेचा मुद्दा चर्चेला आला. त्यामुळे, या व्यवसायाची प्रतिष्ठा पणाला लागल्याची धडकी भरल्याने कंपनीच्या मालकांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. मात्र, अनेक गंभीर मुद्द्यांवर केवळ सारवासारव करण्याचा प्रयत्न झाला.
हेही वाचा - वाघाच्या हल्ल्यात एक व्यक्ती ठार; तळोधी वनपरिक्षेत्रातील घटना
काय आहे प्रकरण
बल्लारपूर येथील युवती पुणे येथे सीआरपीएफच्या चाचणीसाठी गेली होती. 25 फेब्रुवारीला ती डीएनआर ट्रॅव्हल्सने परत येत होती. रात्री 9 वाजता ट्रॅव्हल्स जालना येथे थांबली असता कंडक्टर मंगेश साखरकर हा युवती खाली उतरली असता तिच्या मागे लागला. मला तुमच्याशी फोनवर पर्सनल बोलायचे आहे, असा तगादा साखरकर लावू लागला. यामुळे त्रस्त झालेली युवती त्याच्यावर ओरडली. तुला जे काही बोलायचे आहे ते इथेच बोल, अशी ती म्हणाली. यावर त्याने ट्रॅव्हल्समध्ये गेल्यावर फोनवर बोलतो असे सांगितले.
बस सुरू झाली असता रात्री 10 वाजून 55 मिनिटांनी त्याने या युवतीला कॉल केला. यामुळे भिलेल्या युवतीने फोन उचलला नाही. मग तिने आपल्या भावाला फोन केला. यावेळी या कंडक्टरला कॉन्फरन्समध्ये घेऊन त्याची कानउघडणी केली गेली. 26 फेब्रुवारीला सकाळी साडेआठ वाजता ही युवती खाली उतरली असताना देखील साखरकर याने तिच्याशी बोलणे सुरू केले. मला तुझ्याशी पर्सनल बोलायचे होते, पण तू तुझ्या भावाला फोन लावला. तू बोलली असती तर बरे झाले असते, असे म्हणत तो जवळ आला आणि हातांनी इशारे करू लागला.
पोलीस ठाण्यात तक्रार घेण्यास टाळाटाळ
ही युवती 28 फेब्रुवारीला तक्रार देण्यास रामनगर पोलीस ठाण्यात पोहचली असता, डीएनआर ट्रॅव्हल्सचे प्रकरण असल्याने टाळाटाळ करण्यात येत होती. अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पोलिसांची कानउघडणी केली असता तब्बल चार तासांनी तक्रार दाखल करून घेण्यात आली.
डीएनआर मालकांचे स्पष्टीकरण
असे काही घडले असल्याची आपल्याला कल्पना नव्हती. ही गोष्ट माहिती झाल्यावर आपण या कंडक्टरला बोलावून घेतले. मात्र, त्याला कल्पना आल्यावर तो पळून गेला. यावेळी आपण सर्व बाहेर होतो. या घटनेशी डीएनआर कंपनीचा कुठलाही संबंध नाही. यापुढे आपण महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी दक्ष यंत्रणा राबविणार, असे मालकातर्फे सांगण्यात आले. महिलांची सुरक्षा ही आमच्यासाठी सर्वतोपरी असून यात कर्मचारी दोषी असल्यास त्याला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. पत्रकार परिषदेत राणापाल सिंह डल्लेके, अमरीतपाल सिंह डल्लेके, जतींदरसिंह डल्लेके, परमजित सिंह डल्लेके, निखिल बोहरा उपस्थित होते.
डीएनआर व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा
या प्रकरणामुळे पीडित युवतीला मोठ्या मानसिक त्रासाला समोर जावे लागले. 28 फेब्रुवारीला याची तक्रार तिने डीएनआरच्या कार्यालयात जाऊन केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. हा प्रकार लक्षात आल्यावर त्या कर्मचाऱ्याला बोलावून स्वतः पोलिसांच्या हवाली करायला हवे होते, मात्र तसेही झाले नाही. या प्रकाराबाबत स्वतः पोलिसांकडे तक्रार देखील दाखल करण्यात आली नाही. या युवतीने दाखविलेल्या धाडसामुळे गुन्हा दाखल झाला आणि हा प्रकार समोर आला. युवतीच्या घरच्यांनी ते मोठे लोक आहेत, त्यांच्याविरोधात तक्रार नको करू, असे समजावले. मात्र, तरीही तिने तक्रार दाखल केली. यामुळे ते प्रचंड नाराज आहेत आणि घरी तणावाचे वातावरण आहे. मात्र, युवतीच्या तक्रारीमुळे ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा - इको-प्रोच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा; मुनगंटीवारांचे उपोषण मागे घेण्याचे आवाहन