चंद्रपूर - नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक जाहीर होताच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी बैठक घेऊन, आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी आदर्श आचारसंहिता कालावधीत नवीन योजनांची घोषणा न करणे, शासकीय संदेश प्रणालीवरील राजकीय नेत्यांचे छायाचित्रे काढून टाकणे, नवीन निविदा प्रक्रिया न करणे, नवीन कामांना तांत्रीक मंजुरीची शिफारस न देणे, शासकीय वाहनाचा प्रचारासाठी वापर न करण्याबाबत सूचना दिल्या.या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाळ, उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
दरम्यान या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 36 मुख्य मतदान केंद्र तर 14 सहाय्यक मतदान केंद्र असे एकूण 50 मतदान केंद्र राहणार आहेत. जिल्ह्यात नोंदणीकृत पदवीधर मतदारांची एकूण संख्या 32 हजार 89 इतकी आहे. 5 नोव्हेंबरपासून सुरू होणारी निवडणूक प्रक्रिया 7 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.