चंद्रपूर - धाबा पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन काही शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. सकमुर येथील श्रीराम काळे यांच्या शेताला लागून ही पाईपलाईन गेली असून मागील तीन वर्षापासून ती लीक झाली आहे. त्यातून शेतात सतत पाणी झिरपत असल्याने शेतातील पिकांची मुळे कुजून जात आहेत. काळे यांनी पाणी पुरवठा विभागाकडे या लिकेजची दुरुस्ती करण्याची वारंवार मागणी केली. निवेदनेही दिली मात्र, अद्यापही पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. या प्रकाराने काळे यांचे दरवर्षी मोठे नुकसान होत आहे.
धाबा पाणी पुरवठा योजनेतून बारा गावांना पाणी पुरवठा केला जातो. ही योजना ठेकेदारामार्फत चालवली जाते. ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे ही योजना अधूनमधून बंद असते. आता ही योजना काही शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. श्रीराम काळे यांच्या शेतात लिकेजमधून पाणी झिरपते. त्यामुळे शेतात टाकलेले बियाणे, कोवळी पिके कुजूण जात आहेत. शेतात जाणाऱ्या मार्गावरच लिकेज असल्याने ये-जा करण्यासाठी काळे यांना मोठी कसरत करावी लागत आहे. याबाबत काळे यांनी चंद्रपूर ग्रामीण पाणी पूरवठा विभागाशी वारंवार पत्रव्यवहार केला मात्र, विभागाने त्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे.
दरम्यान, धाबा प्रादेशिक पाणी पूरवठा योजना मागील दोन दिवसांपासून ठप्प पडल्याने बारा गावातील नागरिकांची पाण्यासाठी वनवन सुरू आहे. काही दिवसांपूर्वी देखील ही योजना सलग सहा दिवस बंद होती. आता पुन्हा दोन दिवसांपासून गावातील नळ कोरडे पडले आहेत. परिणामी ऐन पावसाळ्यात तब्बल बारा गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे.