चंद्रपूर - जनता कर्फ्यू या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला असला तरी यावेळी नेमकं चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातील सफाई कामगारांनी आपल्या न्याय हक्कासाठी जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होत नसल्याचे मुख्यमंत्र्यांच्या नावे फलक झळकावले आहे. आमच्यासाठी थाळ्या आणि टाळ्या वाजवत असला तरी आमच्या पगाराचं काय? असा प्रश्न कामगारांच्या वतीने जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केला आहे.
हेही वाचा - 'तुमचे आभार... मात्र 'अशा' लोकांना प्रसिद्धी देऊन प्रोत्साहन देऊ नका'
देशभर तातडीच्या सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यासाठी ताट-वाट्या वाजवल्या जात होत्या, त्याचवेळी सफाई कामगार आपल्या न्याय मागण्याचे आवाहन करीत होते. आम्हाला ताट-वाट्या आणि टाळ्यांचे आभार नको तर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी पाच महिन्यांचे थकीत वेतन द्या, अशी त्यांची मागणी होती. किमान वेतनाच्या मागणीसाठी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयातील महिला कंत्राटी कामगार मागील अनेक दिवसांपासून आंदोलन करीत आहेत.
जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. मात्र अद्यापही त्यांची मागणी पूर्ण झालेली नाही. अशातच कोरोनाचे संकट आल्याने या महिला सफाई कामगारांना पुन्हा सेवेत रुजू व्हावे लागले. आपले काम आणि जबाबदारी त्या प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. मात्र, त्यांची मागणी अद्याप पूर्ण झाली नाही. मागील पाच महिन्यांपासून त्यांना वेतनच मिळालेले नाही. अशावेळी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा हा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूविरोधात लढा देण्यासाठी जनता कर्फ्यूचे आवाहन जनतेला केले, एवढेच नव्हे तर जनतेला तातडीची सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी ताट आणि वाट्या वाजवून आपल्या भावना व्यक्त करण्याचे सांगितले. त्यानुसार जनतेने अभूतपूर्व प्रतिसाद दिला.