चंद्रपूर - कॅन्सरच्या रुग्णांची वाढती संख्या आणि त्यांची उपचारासाठी होणारी दगदग ही एक मोठी समस्या होती. किमोथेरपी घेण्यासाठी रुग्णांना नागपुरात जावे लागायचे. मात्र, हा रुग्णांची ही हेळसांड थांबणार आहे. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात (Chandrapur Cancer Center ) कॅन्सर केअर फाउंडेशन व टाटा ट्रस्ट मुंबईच्या ( Tata Trust Mumbai ) माध्यमातून एक अत्याधुनिक 'डे केअर केमोथेरपी सेंटर'ला सुरवात झाली आहे. सगळ्याच प्रकारच्या कॅन्सरवर येथे उपचार होणार असल्याने याचा सर्वाधिक लाभ चंद्रपूरसह वर्धा, यवतमाळ, गडचिरोली व लगतच्या आंध्रप्रदेशातील रुग्णांना होणार आहे.
रुग्णांच्या वेळेची व पैशांची होणार बचत -
2013पासून सुरू असलेल्या राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात ही बाब उघडकीस आली. या कार्यक्रमाअंतर्गत प्रामुख्याने कर्करोग, मधुमेह, ब्लड प्रेशर व इतर रुग्णांचा शोध घेण्यात येतो. चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर मुखाचा (ओरल कॅन्सर) कर्करोग, दुसऱ्या क्रमांकावर गर्भाशयाचा (सर्व्हायकल कॅन्सर) तर तिसऱ्या क्रमांकावर स्तनाचा (ब्रेस्ट कॅन्सर) कर्करोग असणारे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले. कर्करोगाची तीव्रता बघून रुग्णांना नागपूर मेडिकल कॉलेज किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर इन्स्टिट्यूट शिवाय पर्याय नव्हता. परंतु आता चंद्रपुरात 'डे केअर कॅन्सर केमोथेरपी युनिट' सुरू झाल्याने रुग्णांच्या वेळेची व पैश्यांची बचत होणार आहे. सामान्य आरोग्य विभाग, जिल्हाशल्यचिकित्सक व चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता यांच्या सहकार्यातून हे 'डे केअर युनिट'टाटा ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांच्या सेवेत सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. दरवर्षी 4 फेब्रुवार रोजी जागतिक कर्करोगदिन पाळण्यात येतो. त्याचेच औचित्य साधून चंद्रपुरात 'डे केअर सेन्टर 'चे उदघाटन उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी आयएमए अध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे, सचिव अनुप पालीवाल, अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, टाटा मेडिकल कॉलेज मुंबई अधिष्ठाता व कॅन्सर केअर फाउंडेशनचे संचालक डॉ. कैलास शर्मा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
अत्याधुनिक साहित्यासह 8 बेडची स्वतंत्र सोय -
डे केअर सेंटरमध्ये सर्व प्रकारची माहागडी औषधी, डॉक्टर्स व कर्मचारी मंडळी टाटा ट्रस्टतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात बायोसेफ्टी कॅबिनेट, लॅमीनर फ्लो व मल्टि पॅराचा प्रामुख्याने समावेश आहे. किमोथेरपीचे सायकल असतात, कधी कधी केमोथेरपी झाल्यावर रुग्णांना त्रास झाल्यास पुढील उपचाराची गरज भासते, म्हणून 8 बेडची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिली.