चंद्रपूर - देशात लॉकडाऊनचा 5 वा टप्पा सुरू असून, या काळात सायबर विभागाकडून सोशल माध्यमांवर करडी नजर ठेवली जात आहे. लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये सोशल माध्यमांचा वापर करत काही गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक जातीय तेढ निर्माण करून अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रवृत्तीच्या समाजकंटकांविरोधात राज्याच्या महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत.
जिल्ह्यात, चंद्रपूर पोलीस ठाण्यामध्येही एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील आरोपीने आपल्या फेसबुक प्रोफाईलवरून फिर्यादीला टॅग करून फिर्यादीबाबत कोरोना महामारीशी निगडित आक्षेपार्ह व चुकीचा मजकूर असणारी पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे पीडित तक्रारदारास मानसिक त्रास सहन करावा लागला होता. तर, त्यामुळे या जिल्ह्यात सायबर गुन्ह्यांची संख्या आता ६ वर गेली आहे.
राज्यात लॉकडाऊन काळात सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात ४६४ गुन्हे दाखल झाले असून २५४ व्यक्तींना अटक केली आहे. तर, आक्षेपार्ह व्हॉट्सअॅप संदेश फॉरवर्ड केल्याप्रकरणी १९२ गुन्हे दाखल झाले आहेत. तर, आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १८८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत. व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत. तर, ऑडिओ क्लिप्स, युट्युबचा गैरवापर केल्याप्रकरणी ४९ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत २५४ आरोपींना अटक केली आहे.