चंद्रपूर - राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक जिल्ह्यात तर संचारबंदी लावण्याची वेळ आली आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्राशेजारी असलेल्या अनेक राज्यांनी हायअलर्ट घोषित केला असून त्यांच्या राज्यात येण्यासाठी मज्जाव करण्यात येत आहे. अशावेळी महाराष्ट्र आणि तेलंगाणा राज्याच्या सीमेवर नेमकी काय स्थिती आहे, हे ईटीव्ही भारतने जाणून घेतले.
कोरोनाचा विशेष कक्ष
चंद्रपूर जिल्ह्याला तेलंगाणा राज्याची सीमा लागून आहे. तेलंगाणा राज्यातून येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी लक्कडकोट येथे उपप्रादेशिक परिवहन विभागाचा तपासणी नाका आहे. तर महाराष्ट्रातून तेलंगाणा राज्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी त्यांच्या हद्दीतील वांकडी येथील तपासणी नाक्यावर केली जाते. कोरोनाच्या काळात जेव्हा संचारबंदी लागली होती, तेव्हा दोन्ही राज्यातील नाक्यांवर कोरोनाचा विशेष कक्ष तयार करण्यात आला होता. मात्र आता तो काढून टाकण्यात आला आहे.
वसूल केले जाते चालन
तेलंगाणा राज्यातील नाक्यावर रुटीन पद्धतीने काम सुरू आहे. म्हणजे हद्दीत प्रवेश करणाऱ्या वाहनाचा परवाना आणि अनेक कागदपत्रांची पाहणी केली जाऊन त्यांच्याकडून चालन वसूल केले जाते. याव्यतिरिक्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे येणाऱ्या वाहनांना इतके निर्बंध लावण्यात आले नाही. त्यामुळे राज्यातून येणाऱ्या वाहनांना तूर्तास दिलासा मिळताना दिसत आहे. मात्र जर भविष्यात महाराष्ट्रातही संख्या झपाट्याने वाढली तर मात्र पून्हा या निर्बंधांना समोर जावे लागण्याची शक्यता आहे.