चंद्रपूर- मागील २० दिवसात जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूत ६ पटीने, तर कोरोनाच्या रुग्णांमध्ये तब्बल ३ पटीने वाढ झाली आहे. एकंदरीत ही आकडेवारी भयावह आहे. ११ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ८९८ कोरोनाचे रुग्ण होते, तर ५ जणांचा मृत्यू झाला होता. ३१ ऑगस्टपर्यंत रुग्णांची संख्या २ हजार ७६३, तर मृत्यूची संख्या ही २९ पर्यंत पोहोचली. कोरोनाची स्थिती हाताळण्यात राज्यात अव्वल असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याची अचानक अशी चिंताजनक स्थिती कशी झाली? हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
या परिस्थितीला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांची अचानक झालेली बदली, लोकप्रतिनिधींची उदासीनता, जिल्हाप्रशासनाचे अपुरे नियोजन आणि प्रयत्न, आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा की लोकांचा बेजबाबदारपणा कारणीभूत तर नाही ना ? यावर सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. राज्यात सर्वत्र कोरोनाचे थैमान असताना चंद्रपूर मात्र कोरोनामुक्त होते. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांचे उत्तम नियोजन यास कारणीभूत होते. म्हणूनच देशात टाळेबंदी लागल्याच्या तब्बल दीड महिन्यांनी २ मे रोजी जिल्ह्यात पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद झाली. सर्व कोरोनाग्रस्तांवर जिल्ह्याच्या मुख्यालयात एकाच छताखाली उपचार होत असल्याने राज्यात कोरोनामुळे एकही रुग्णाचा मृत्यू न झाल्याचा मानही चंद्रपूर जिल्ह्यालाच मिळाला होता.
१ ऑगस्टला चंद्रपूरमध्ये पहिल्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. यानंतर आवश्यक अशा उपाययोजना देखील करण्यात आल्या. चंद्रपूरसह जिल्ह्यातील इतर ठिकाणी आवश्यकतेनुसार टाळेबंदी लावण्यात आली. सर्व सुरळीत सुरू असताना व्यवस्थेला मोठा आघात बसला तो जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या बदलीचा. सर्व स्थिती नियंत्रणात असताना त्यांची तडकाफडकी बदली केल्याने सामान्य नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. केवळ राजकीय महत्वाकांक्षेपायी त्यांना हलविण्यात आले असेही सूर उमटू लागले. नवे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना कोरोनाची स्थिती हाताळण्याचा अनुभव नाही. ते पहिल्यांदाच या आव्हानांना तोंड देत आहे. त्यामुळे, त्यांना एकूण स्थिती समजून घेण्यासाठी काही दिवस का असेना मात्र वेळ लागेल.
गुल्हाने यांनी जेव्हा पदभार सांभाळला तेव्हा जिल्ह्यात बाधितांची संख्या ही ८९८, तर मृतांची संख्या ही ५ होती. तर, १ सप्टेंबरला मृतांच्या संख्येत तब्बल ६ पट वाढ झाली. एकूण २९ जणांचा मृत्यू तोपर्यंत झाला होता. तर, रुग्णांच्या संख्येत थेट ३ पटीने वाढ झाली. आता रुग्णांची संख्या ही २ हजार ७६३ इतकी आहे. सोबतच लोकप्रतिनिधींची उदासीनता देखील याला कारणीभूत आहे, असे बोलले जाते.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे नागपूरला राहतात. सहसा आठवड्यातून एकदाच ते चंद्रपुरात येतात. खासदार बाळू धानोरकर हे देखील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काही महत्वाच्या बैठकी वगळता फारसे फिरकले नाहीत. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही फार काही बैठकींना हजेरी लावली नाही. आज सध्याची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. जिल्हा कारागृहातील तब्बल १०० कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आमदार किशोर जोरगेवार, उलगुलान संघटनेचे राजू झोडे हे देखील पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर सुनील टेकाम यांचा कोरोनाशी लढताना मृत्यू झाला. एका महिला पोलिसाचा देखील मृत्यू झाला आहे. पोलीस, वैद्यकीय क्षेत्रातील अनेक बडे अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आता तर रुग्णांची संख्या इतकी झपाट्याने वाढत आहे की आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे.
आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचे अनेक घटनांमधून समोर आले आहे. तर दुसरीकडे नागरिक देखील कोरोनाच्या नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. ही सर्वच कारणे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढविण्यासाठी जबाबदार असू शकतात. त्यामुळे, येत्या काळात सर्वांनी आपली जबाबदारी समजून नियोजन करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट होण्यास जास्त वेळ लागणार नाही. किंबहुना, आपण या परिस्थितीच्या उंबरठ्यावर उभेच आहोत, अशीच काहीशी परिस्थिती आहे.
जिल्ह्यात कोरोनाची स्थिती
२ मे : पहिला रुग्ण
१६ जून : ५० रुग्ण
३ जुलै : १०० रुग्ण
१४ जुलै : २०० रुग्ण
२६ जुलै : ४०० रुग्ण
८ ऑगस्ट : ८०० रुग्ण
१४ ऑगस्ट : १००० रुग्ण
२९ ऑगस्ट : २००० रुग्ण
१ सप्टेंबर : २ हजार ७६३ रुग्ण
हेही वाचा- प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला मिळणार दहा हजार; मदत व पुनर्वसनमंत्री वडेट्टीवार यांची घोषणा